Spread the love

कोल्हापूरच्या पठ्ठ्याने पटकावला किताब

पुणे/ महान कार्य वृत्तसेवा
वीजसेवेच्या धकाधकीचे दैनंदिन कामकाज सांभाळून शरीराला सुडौल व सुबद्ध आकार देत शरीरसंपदा कमावणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकत वाहवा मिळवली. यात कोल्हापूर परिमंडलाचे राहुल विजय कांबळे यांनी पहिला ‘महावितरण श्री’चा किताब पटकावला. दरम्यान, बारामती येथील विद्यानगरी प्रतिष्ठानच्या क्रीडा संकुलात सुरु असलेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अतितटीच्या लढतींमुळे रंगतदार होत आहे. सांघिक कामगिरीमध्ये पहिल्या दिवशी पुणे-बारामती संघाने वर्चस्व ठेवत आगेकूच सुरु केली. या स्पर्धेदरम्यान, नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना प्रकाशमान करणारे एमएसईबीचे कर्मचारी, लाईनमन बनून वायरी जोडणारे हात जेव्हा सुडौल व आकारबद्ध शरिराचे प्रदर्शन करतात तेव्हा टाळ्या अन्‌‍ शिट्टयांची दाद मिळणारच.
महावितरणच्या क्रीडास्पर्धेत यंदा प्रथमच शरीरसौष्ठव स्पर्धेचा समावेश करण्यात आल्याने या स्पर्धेतील उत्सुकता आणि आनंद द्विगुणीत झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी (दि. 5) रात्री विविध वजनगटात शरीरसौष्ठव स्पर्धा झाली. यामध्ये तब्बल 31 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत आश्चर्याचा धक्का दिला. या स्पर्धेत पिळदार शरीरयष्टीचे दमदार प्रदर्शन करीत कोल्हापूरच्या राहुल विजय कांबळे यांनी ‘महावितरण श्री’चा किताब पटकावला. त्यांच्यासह विविध वजनगटातील विजेते व उपविजेत्यांना पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सर्वश्री धर्मराज पेठकर, स्वप्निल काटकर, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे, मुख्य महाव्यवस्थापक (मासं) भुषण कुलकर्णी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांच्याहस्ते पदक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.