दुबई/महान कार्य वृत्तसेवा
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला विजयासाठी 252 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे भारतानं 49 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. यासह भारतानं 12 वर्षांनंतर मिनी वर्ल्ड कप जिंकलं आहे. यापूर्वी 2013 मध्ये भारतानं ही स्पर्धा जिंकली होती.
रोहितची आक्रमक सुरुवात : कीवींनी दिलेल्या 252 धावांच्या पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात वादळी झाली. शुभमन गिलसोबत रोहितनं पहिल्या 10 षटकांत 64 धावा केल्या. मात्र यानंतर मधल्या षटकात 17 धावांत 3 विकेट गमावल्यानं टीम इंडिया अडचणीत आली. यादरम्यान रोहितही 76 धावा करुन आउट झाला. पुढे अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांच्यात 61 धावांची भागीदारी झाली आणि भारताचा विजय सुकर झाला. शेवटी राहुलनं (34) संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी : या विजेतेपदाच्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियासमोर 252 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं. कीवी संघाकडून डॅरिल मिशेलनं 63 आणि मायकेल बेसवेलनं नाबाद 53 धावा केल्या. तर भारतीय संघातील फिरकीपटूंनी त्यांची जादू दाखवली. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांना 1-1 विकेट मिळाली. यामुळं कीवी संघानं 7 विकेट गमावल्यानंतर 251 धावा केल्या.
2000 च्या फायनलचा बदला पूर्ण : या विजयासह टीम इंडियानं 2000 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचाही बदला घेतला आहे. त्या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करायला आली. कर्णधार सौरव गांगुलीनं शानदार शतक (117 धावा) झळकावलं होतं. सौरव गांगुली व्यतिरिक्त सचिन तेंडुलकरनं 69 धावा काढल्या. परिणामी टीम इंडियानं 6 बाद 264 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, ख्रिस केर्न्स (102) च्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 4 विकेट्सने सामना जिंकला आणि न्यूझीलंड संघ चॅम्पियन ठरला होता.
