Spread the love

पुणे/महान कार्य वृत्तसेवा
कबड्डी हा सांघिक खेळ आणि या खेळाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. हा खेळ आता महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध खेळ म्हणून खेळला जातो. आता याच खेळात एका मराठी मुलीची भारतीय संघाची कर्णधार म्हणून निवड झालीये. सोनाली शिंगटे ही आता आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. आशियाई कबड्डी महासंघाच्या वतीने इराणमध्ये या स्पर्धा घेण्यात येत आहेत. सोनालीबरोबरच पुण्याच्या आम्रपाली गलांडेची देखील संघात निवड करण्यात आलीये.
आशियाई कबड्डी स्पर्धा 4 ते 9 मार्च दरम्यान इराणमध्ये तेहरान येथे होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर या संघाची निवड करण्यात आली. हिमाचल प्रदेश संघाची पुष्पा राणा संघाची उपकर्णधार असेल. तर संघात ज्योती ठाकूर, साक्षी शर्मी, पूजा काजला, भावना देवी, पूजा नरवाल, निधी शर्मा, आमपाली गलांडे, रितू नेहा दक्ष, संजू देवी या खेळाडूंचा समावेश आहे.

कोण आहे सोनाली शिंगटे?
सोनाली शिंगटे हिचा जन्म मुंबईतल्या लोअर परळ इथे 27 मे 1995 साली झाला. तिने महर्षी दयानंद कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. लहानपणी तिला क्रिकेटमध्ये खूप आवड होती, पण सोनालीच्या कुटुंबाला क्रिकेट खेळण्यासाठी तिला पाठिंबा देणं परवडणारं नव्हतं. नंतर तिनं कॉलेजमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून कबड्डी खेळायला सुरूवात केली.