इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
पुर्वीच्या वादातून 24 सप्टेंबर 2016 रोजी हातकणंगले ते रूई फाटा जाणाऱ्या रोड वर तिळवणी गावच्या हद्दीत दगडाने मारहाण करून शशिकांत बबन कांबळे रा. साजणी याचा खून केलेच्या आरोपातील संशयीत सुशांत उर्फ छकुला निवास कांबळे, सुरज अशोक कांबळे दोघे राहणार साजणी यांची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली. संशयीता तर्फे जेष्ठ विधीज्ञ अॅड. मेहबूब बाणदार यांनी काम पाहिले.
सुमारे एक वर्षापुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून शशिकांत कांबळे यास हातकणंगले ते रूई फाटा या रोड वर अडवून त्याला मारहाण करून त्याच्या डोक्यावर दगड घालून खून केलेच्या आरोपातील संशयीत सुशांत व सुरज यांना हातकणंगले पोलिसांनी दि. 24 सप्टेंबर 2016 रोजी अटक केली होती. याबाबतची फिर्याद मयताचा भाऊ दिपक कांबळे यांनी दिली होती. तद्नंतर न्यायालयाकडून यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.
सदर प्रकरणाची सुनावणी 13 जानेवारी 2023 पासुन इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली. सरकारपक्षातर्फे फिर्यादी, सरकारी पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, नायब तहसिलदार, तपासी अधिकारी रावसाहेब रानगर अशा एकूण 15 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. हातकणंगले ग्रामीण रूग्णालायाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.श्रीधर वाघ यांचीही महत्वाची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारपक्षातर्फे
विविध पंचनामे, ओळखपरेड, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व फिर्यादी यांचे जबाबाआधारे जोरदार युक्तिवाद करण्यात आला. तथापि, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार याचा जबाब घटनेनंतर आठ दिवसाने, ओळखपरेड तब्बल दोन महिन्यानंतर, खुनाचा हेतू सिध्द होत नाही, घटनास्थळ हे गजबजलेले, रहदारीचे ठिकाण मात्र तात्काळ कोणताही साक्षीदार उपलब्ध होत नाही, ज्या तरूण भारत च्या पत्रकाराने अपघात झाला आहे असे पोलिस स्टेशनला कळवले त्या बाबत कोणतीही चौकशी नाही, घटनेच्या पुर्वीच फोटो काढले, मृतदेह व घटनास्थळावरील वस्तू या तब्बल 5 तास रस्त्यावरच पडून होत्या, सी.ए.ला मुद्देमाल हा उशीरा पाठवला, निव्वळ संशयावरून संशयीतांना अटक केली आहे हा युक्तिवाद संशयीत चे वकिल अॅड. मेहबूब बाणदार यांनी मांडला. सदर युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने दोन्ही संशयीतांची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली.
