Spread the love

दुबई/महान कार्य वृत्तसेवा
2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन हात करेल. हा सामना 9 मार्च (रविवार) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 2.30 वाजता सुरु होईल. भारतीय संघानं सेमी-फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला 4 गडी राखून पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दरम्यान, न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव करुन जेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळवलं.
विजेत्यां संघावर पडेल पैशांचा पाऊस : यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकणारा संघ निश्चितच श्रीमंत होईल. शिवाय, हरणारा संघही श्रीमंत होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं या स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम आधीच जाहीर केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला सुमारे 19.48 कोटी रुपये (2.24 मिलियन डॉलर) मिळतील. अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला, म्हणजेच उपविजेत्या संघाला अंदाजे 9.74 कोटी रुपये (1.12 मिलियन डॉलर) मिळतील.
उपांत्य सामन्यात पराभूत झालेले संघही होतील मालामाल : शिवाय, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना सुमारे 4.87 कोटी रुपये (5,60,000 अमेरिकन डॉलर्स) इतकंच बक्षीस देण्यात आलं. याचा अर्थ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघही श्रीमंत झाले आहेत. तर गट फेरीतून बाहेर पडलेल्या संघांनाही बक्षीस रक्कम मिळाली आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना (अफगाणिस्तान आणि बांगलादेश) समान रक्कम सुमारे 3.04 कोटी रुपये मिळाले. तर सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या संघांना (पाकिस्तान आणि इंग्लंड) समान रक्कम सुमारे 1.22 कोटी रुपये मिळाले.