मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
टीम इंडियाचा टेस्ट आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा याने जवळपास एका दशकानंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केलं आहे. बीसीसीआयने टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटर्सना रणजी ट्रॉफीमध्ये खेळणे अनिवार्य केल्यामुळे रोहित मुंबईच्या संघाकडून गुरुवारी जम्मू काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी उतरला. मुंबईच्या बीकेसी मैदानावर हा सामना सुरु असून यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल मुंबईकडून सलामी फलंदाजी करण्यासाठी उतरले, परंतु टीम इंडियाचे स्टार फलंदाज समाधानकारक धावसंख्या करण्यात फेल ठरले.
गुरुवारी मुंबईच्या बीकेसी मैदानावर मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर यांच्यात रणजी ट्रॉफीच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्याचा टॉस मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली. यावेळी मुंबईकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे सलामी फलंदाजीसाठी मैदानात उतरले. मात्र यशस्वी 4 धावा करून आकिब नबीच्या बॉलवर बाद झाला तर रोहित शर्मा देखील केवळ 3 धावा करून गोलंदाज पारस डोगराच्या बॉलवर बाद झाला. टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा सध्या वाईट फॉर्ममधून जात आहे. रोहितने तब्बल 9 वर्ष 3 महिन्यांनी रणजीमध्ये पुनरागमन केले होते मात्र येथे देखील तो फ्लॉप ठरला.