तारदाळ येथे कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.बेंदूर हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी घट्ट जोडलेला सण असून, वर्षभर शेतीच्या कामात साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो.
यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलजोड्यांना आकर्षक रंगरंगोटी करून, झुली, घुंगरू, गोंडे, फुलांचे हार व विविध अलंकारांनी सजवले. सजलेल्या बैलजोड्यांची समर्थ नगर परिसरात दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.मिरवणुकीदरम्यान हलगी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हलगीच्या ठेक्यावर बैलांनीही ताल धरल्याचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. बैलांच्या नृत्यसदृश हालचालींनी उपस्थितांची मने जिंकली. अनेकांनी या क्षणांचे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रीकरण करून आनंद लुटला.कर्नाटकी बेंदूरच्या निमित्ताने तारदाळमध्ये सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक परंपरा आणि कृषी संस्कृतीचे दर्शन घडले. बैलांविषयीची कृतज्ञता, शेतकऱ्यांची निसर्गाशी असलेली नाळ आणि ग्रामीण संस्कृतीचे जतन यांचा सुंदर संगम या उत्सवातून अनुभवायला मिळाला. त्यामुळे यंदाचा बेंदूर सण ग्रामस्थांच्या स्मरणात राहणारा ठरला
