Spread the love

शिरोळ :

वारस व फेरफार नोंद करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, शिरोळ येथील निमतानदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संजय बापू तेली (वय ५२, रा. आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे असून ते उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, शिरोळ येथे निमतानदार म्हणून कार्यरत आहेत.
तक्रारदार यांच्या आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या नावावरील मिळकतीवर वारस व फेरफार नोंद करण्यासाठी तक्रारदारांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, शिरोळ येथे अर्ज केला होता. संबंधित काम आरोपी संजय तेली यांच्याकडे होते. हे काम करून देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केली असता, आरोपीने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारदारांकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना संजय तेली यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप तसेच पोहेकॉ. सुधीर पाटील, पो.कॉ. कृष्णा पाटील, संदीप पवार आणि रविंद्र पाटील यांच्या पथकाने केली. लाच अथवा अपसंपदेबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री हेल्पलाईन १०६४ किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.