
पुलाची शिरोली(प्रतिनिधी)विद्याधर कांबळे
टोप, ता.हातकणंगले येथे ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या कामाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर स्टेटस म्हणून ठेवल्याचा रागातून टोप येथील एका युवकास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
नागेश पिलाजीराव पाटील (वय ३९, रा. कासारवाडी फाटा, टोप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात धनाजी बाबुराव पाटील, भगवान शंकर भोसले, विजय आनंदा भोसले, सुनिल बाबासो काटकर, सुरेश विठ्ठल भोसले, युवराज देसाई (कवठेकर) व सागर पांडुरंग पाटील (सर्व रा. भोसले खडी, टोप, ता. हातकणंगले) अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नागेश पाटील यांनी ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या एका कामाचा व्हिडिओ चित्रीकरण करून तो आपल्या मोबाईलवर स्टेटस म्हणून ठेवला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून संशयित आरोपींनी आज दुपारी नागेश यांना त्यांच्या राहत्या घरासमोर गाठले. बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी धनाजी बाबुराव पाटील आणि सागर पांडुरंग पाटील यांनी हॉकी स्टिकने नागेश यांच्या उजव्या पायावर व हातावर जोरात मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले आहे आणि त्यास जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. या घटनेने टोप परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
