Spread the love

जयसिंगपूर :
ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानांतर्गत दानोळी, कोथळी आणि कवठेसार येथील एकूण ४२३ नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चष्मे प्रदान करण्यात आले.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांची मोफत आरोग्य व नेत्र तपासणी करून आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसह चष्म्यांची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे.
यामध्ये दानोळी येथील १२८, कोथळी येथील १२५, तर कवठेसार येथील १७० नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. नेत्र तपासणीदरम्यान दृष्टीदोष आढळलेल्या नागरिकांना मोफत चष्मे मिळाल्याने त्यांना दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान या आरोग्य अभियानात ज्येष्ठ नागरिकांचे तपासणी दरम्यान मोफत मोतीबिंदू ऑपरेशन सुद्धा करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे वेळेवर नेत्र तपासणी आणि चष्मे घेणे शक्य होत नाही. अशा नागरिकांना गावातच तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आवश्यक चष्मे मोफत दिले जात असल्याने या अभियानाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.
स्व. शामरावअण्णा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या या आरोग्य अभियानाला तालुक्यातील विविध गावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आरोग्यसेवेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
दानोळी येथे झालेल्या चष्मे वाटप कार्यक्रमात महादेव धनवडे, पै. केशव राऊत, बापूसाहेब दळवी, गुंडू हरिबा दळवी, डी.ए. पाटील, विकास वाळकुंजे, परशुराम सावंत, जनार्दन लोहार, पै. सुकुमार पाटील सकाप्पा, धन्यकुमार पाराज तर कवठेसार येथे झालेल्या कार्यक्रमात सभापती मिलिंद कुरणे, सरपंच पोपट भोकरे, उपसरपंच स्वाती संतोष भोकरे, ग्रामपंचायत अधिकारी अतुल कांबळे, सुभाष माने, रमेश मगदूम, संतोष भोकरे,भरत तेरदाळे, बाबासाहेब मगदूम, भिमराव पाटील, ओंकार पाटील, यशवंत गुरव, विजय नांद्रेकर, माणिकचंद भोकरे, जवाहरचे मा.संचालक आप्पासाहेब तेरदाळे, बाबा गाडवे, राजू आवगोंडा, बाळासाहेब कुरणे,के.जी.कांबळे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. कोथळी येथे झालेल्या कार्यक्रमात संजय नांदणे, दिलीप मगदूम, नितीन वायदंडे, सागर बोरगावे, शितल पाटील, रवी पुजारी, भाऊसो पाटील, शिवगोंडा पाटील, भरत कांबळे, संतोष उपाध्ये यांच्यासह यड्रावकर सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.