सिडनी/महान कार्य वृत्तसेवा
ऑस्ट्रेलियानं सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दुसऱ्या डावात भारताला 157 धावांत गुंडाळलं आणि यजमान संघाला 162 धावांचं लक्ष्य मिळालं. भारताकडून दुसऱ्या डावात ॠषभ पंतनं सर्वाधिक 61 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँडनं 45 धावांत 6 तर कर्णधार पॅट कमिन्सनं 44 धावांत तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीनं धमाकेदार सुरुवात केली. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा या सलामीच्या जोडीनं पहिल्याच षटकात 13 धावा केल्या. एवढंच नाही तर पहिली विकेट पडण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 4 षटकांत 39 धावा करण्याचा मोठा पराक्रम केला.
प्रसिध कृष्णाची घातक गोलंदाजी : धावांचा पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का सॅम कॉन्स्टासच्या रुपानं बसला. 22 धावा करुन कॉन्स्टास प्रसिध कृष्णाचा बळी ठरला. यानंतर क्रीजवर आलेला मार्नस लॅबुशेनही प्रसिध कृष्णाच्या चेंडूवर चालायला लागला. लॅबुशेन केवळ 2 धावांचं योगदान देऊ शकला. ऑस्ट्रेलियन संघाला 8 षटकात 56 धावांवर दोन मोठे धक्के बसले होते. यानंतर स्टीव्ह स्मिथ क्रीजवर आला. ऑस्ट्रेलियन चाहत्यांना स्मिथकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण पुन्हा एकदा तो निराश झाला आणि कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचण्यात तो चुकला. त्यानं केवळ 4 धावा केल्या आणि अशा प्रकारे तो कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करण्यापासून फक्त एक धाव दूर राहिला.
कसोटी क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम : सिडनी कसोटीपूर्वी स्मिथला कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यासाठी 38 धावांची गरज होती. सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात स्मिथ 10,000 धावांचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा होती पण तो 33 धावा करुन बाद झाला. अशाप्रकारे 10 हजार धावा पूर्ण करण्याचं त्याचे स्वप्न फक्त 5 धावा दूर राहिलं. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात स्मिथ 10 हजारांच्या क्लबमध्ये आपलं स्थान निर्माण करेल असं सर्वांना वाटत होतं पण प्रसिद्ध कृष्णानं हे होऊ दिले नाही आणि तो केवळ 4 धावांवर गेला. अशाप्रकारे, हा शानदार ऑस्ट्रेलियन फलंदाज त्याच्या कसोटी कारकिर्दीत 9999 धावांवर बाद होणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला. याआधी, कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात असं एकदाच घडले होते. श्रीलंकेचा महेला जयवर्धनं 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9999 धावांवर धावबाद झाला होता.