मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
बिस्बेनमध्ये बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेच्या तिसर्या कसोटीच्या शेवटच्या दिवशीच भारतीय चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. एकीकडे भारताला ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळण्याच्या दृष्टीने ही कसोटी जिंकणं आवश्यक असतानाच कसोटी अनिर्णित राहिली आहे. या धक्क्यातून भारतीय क्रिकेटप्रेमी सावरत असतानाच भारताच्या एका दिग्गज क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हा दिग्गज क्रिकेटपटू या मालिकेत खेळत असून ही त्याची शेवटची मालिका ठरणार आहे.
सर्व प्रकारच्या अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माबरोबर पत्रकार परिषदेला उपस्थित राहून ज्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे त्याचं नाव आहे, रविचंद्रन अश्वीन! भारताचा विश्वासू फिरकीपट्टू अशी ओळख निर्माण केलेल्या अश्वीनने सर्व प्रकारच्या अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अश्वीनने कसोटी नंतर ही घोषणा केल्यावर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये भावूक वातावरण पाहायला मिळालं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुनही अश्वीनच्या निवृत्तीनंतर त्याला शुभेच्छा देणारी पोस्ट करण्यात आली आहे.
कसं राहिलं अश्वीनचं कसोटीमधील करिअर?
अश्वीनने आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये एकूण 537 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने तब्बल 37 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. अश्वीन उत्तम ङ्गलंदाजही करायचा. त्याने कसोटीत एकूण 3503 धावा केल्या. त्याच्यानावावर एकूण 6 कसोटी शतकांची नोंद आहे. कसोटीमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटवणार्यां खेळाडूचा विक्रमही अश्वीनच्या नावावर आहे. 106 कसोटी सामन्यांमध्ये अश्वीन 200 डावांमध्ये खेळला आहे.
अश्वीनने कसोटीत एकूण 27 हजार 246 चेंडू टाकले. अश्वीनच्या गोलंदाजीवर एकूण 12 हजार 891 धावा करण्यात आल्या. अश्वीनची कसोटीमधील एका डावातील सर्वोत्त कामगिरी 59 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स अशी आहे. तर संपूर्ण कसोटीचा विचार केल्यास त्याची संपूर्ण कामगिरी 140 धावांमध्ये 13 विकेट्स अशी आहे. त्याने 24 च्या सरासरीने विकेट्स घेतल्या. त्याची इकनॉमी ही 2.83 इतकी असून स्ट्राइक रेट 50.7 इतकी राहिली. त्याने 25 वेळा 4 विकेट्स गेतल्या आहेत. 8 वेळा त्याने सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.