Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
मराठा सामाज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा असलेला ‘छावा’ चित्रपट सध्या मोठा चर्चेचा विषय आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर यातील साहसी शंभूराजेंच्या भूमिकेतील विकी कौशलवर कौतुकाचा वर्षाव झाला. परंतु यातील लेझीम नृत्याच्या सीनवर अनेक संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे वादही निर्माण झाला. यावर तातडीनं तोडगा काढण्यात निर्माता आणि दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. लेझीमचा सीन काढून टाकण्याचा निर्णय दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांनी जाहीर केला आहे. या चित्रपटाचं स्क्रिनिंग इतिहासकार, छत्रपती घराण्याचे वंशज आणि सामाजिक विचारवंत यांच्यासमोर करणार असल्याची भूमिका निर्मात्यांनी घेतली असल्यामुळं रिलीजच्या दिशेनं एक सकारात्मक पाऊल पडलं आहे.
छत्रपती संभाजी राजेंच्या पराक्रमाची ही गाथा जगभर पोहोचवण्याचं ध्येय या चित्रपटाच्या निमित्तानं निर्मात्यांनी ठेवलंय. याचाच एक भाग म्हणून हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर रिलीज करण्याची तयारी सुरू झालीय. हा चित्रपट भारताबरोबरच रशियातही रिलीज केला जाणार आहे.
ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये याबाबत लिहिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, ”विकी कौशल – रश्मिका – अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ 14 फेब्रुवारी 2025 रोजी भारत आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रदर्शित होण्याबरोबरच एकाच वेळी रशियामध्येही प्रदर्शित होणार आहे. याचं अधिकृत पोस्टर रिलीज करण्यात आलंय.”