लिबर्टी कुठपर्यंत न्यायची…?
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
अभिनेता विक्की कौशलचा ‘छावा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला, ज्यानंतर सिनेमाला मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. चित्रपटाच्या विरोधाची पहिली ठिणगी पुण्यातून पडली आहे. मराठा क्रांती मोर्चाने या चित्रपटाला विरोध केला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई यांच्याबद्दल आक्षेपार्ह प्रसंग दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर संभाजीराजे छत्रपती भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे यांनी म्हटलं, ”स्वराज्याचं उद्दिष्ट त्यांनी सांगितलं त्यात मला काही चुकीचं वाटलं नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की, आमचे लोक इतिहासकार आणि जाणकार लोकांनी हे पाहणं गरजेचं आहे. मी त्यांची वाट पाहत आहे की, ते आपल्याला बोलावतील. एकदा चर्चा झाली आणि सगळं छान आहे असं दिसलं तर सगळंच छान होईल. शिवाजी महाराजांच्या माध्यमातून संभाजी महाराज देशात नाही तर जगात पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पण त्यांच्यातर ते कोणी सांभाळलं असेल तर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आहेत आणि छत्रपती ताराराणी महाराणीसाहेब आहेत.”
ते पुढे म्हणाले, ”संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर हा डान्स दाखवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर सगळेच 8-9 महिन्यात असा डान्स करू शकतात का? यावर मी असं स्टेटमेंट करणं उचित नाहीये. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हा मराठी माणूस आहे. त्यांनी मागची 2-3 वर्ष या सिनेमासाठी दिली आहेत. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य कसं स्थापन झालं याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या भावना मी त्यादिवशी पाहिल्या. त्यामुळे मी त्यांना हेच सांगितलं की, अनेक गोष्टी त्यात असू शकतात ज्यात आपण दुरुस्ती करू शकतो. अजून वेळ हातातून गेलेली नाही. माझी त्यांना विनंती आहे. एखाद्या गोष्टीवर स्टेटमेंट करणं बरोबर नाही. कारण चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्त्वात नाही. त्यांना सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे. त्यांनी इतिहासकार, त्या विषयाची माहिती असलेल्या जाणकारांना बोलवावं, त्यांना आम्ही दुरुस्ती सांगू. त्यात आणखी काही चांगलं दुरुस्त करता येईल जेणेकरून हा सिनेमा अपेक्षेपेक्षा दुप्पट पद्धतीने जगात पोहोचू शकेल.”
”एक आठवड्यापूर्वी लक्ष्मण उतेकर यांनी मला सिनेमाची स्क्रिप्ट दाखवली. मी त्यांना तेव्हाही हेच सांगितलं की, आमच्या इतिहासकार आणि जाणकार लोकांना तुम्ही हे दाखवावं, अशी मी त्यांना विनंती केली. मी त्यांची वाट पाहत आहे. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही.”
”संभाजी महाराजांवर सिनेमा काढताय हे धाडस आहे. ते धाडस उलटं सुलटं जाऊ नये यासाठी सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. संभाजी महाराज जगाला कळावे असा जो तुमचा हेतू आहे तोच आमचाही आहे. पण सिनेमॅटिक लिबर्टी कुठपर्यंत न्यायची याची आपण एक लाइन ड्रॉ करू.”