Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
भारतीय संघाने 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक सामन्यात विजयी सलामी देत दणक्यात मोहिमेला सुरूवात केली आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 9 विकेट्‌‍सने धुव्वा उडवला. वेस्ट इंडिजने भारताला दिलेले विजयी धावसंख्येचे आव्हान अवघ्या 26 चेंडू गाठत विजयी सलामी दिली. वेस्ट इंडिजचा असा मोठा पराभव करत भारतीय संघाने इतर संघांनाही आपल्या कामगिरीची झलक दाखवली आहे.
अंडर-19 टी-20 विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, भारतीय गोलंदाजी आक्रमणामुळे संघ संपूर्ण 20 षटकंही खेळू शकला नाही. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 13.2 षटकांत 44 धावा करत ऑलआऊट झाला, ही त्यांची स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या होती. अशारितीने भारताला विजयासाठी 45 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे भारताने केवळ 4.2 षटकांत 1 गडी गमावून पूर्ण केले.
45 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 4 धावांवर आपली पहिली एकमेव विकेट गमावली. मात्र त्यानंतर भारतीय फलंदाजांनी वेस्ट इंडिजला विकेट घेण्याची दुसरी संधी दिली नाही. कमलिनी आणि सानिका चाळके यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 43 धावांची नाबाद भागीदारी झाली. कमालिनी हिहने 16 तर सानिकाने 18 धावांची खेळी करत संघाला 4.2 षटकांत सहज विजय मिळवून दिला.
भारताच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजयात मोठा वाटा उचलला. जोशिता आणि आयुषी शुक्ला यांनी प्रत्येकी 2 विकेट्‌‍स तर पारूनिका सिसोदिया हिने 3 विकेट्‌‍स घेतले. तर वेस्ट इंडिजचे तीन खेळाडू धावबाद झाले.
क्वालालमपूरमधील खराब हवामानामुळे, भारताने सुरुवातीपासूनच लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजी धारदार ठेवली, याचा उल्लेख भारतीय कर्णधार निकी प्रसादनेही सामन्यानंतर केला. ती म्हणाली की, आम्हाला सामना लवकरात लवकर संपवावा, अशी स्पष्ट सूचना संघ व्यवस्थापनाकडून देण्यात आली होती आणि आम्ही तेच केले. भारताच्या विजयात जोशीथाला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.