Spread the love

राजकोट/महान कार्य वृत्तसेवा
भारताची नवी सलामीवीर प्रतिका रावलने हिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवताच आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. भारत वि आयर्लंड मालिकेत तिने एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळी केल्या पण तिला शतकापर्यंत पोहोचता आले नाही. पण प्रतिकाने अखेरच्या वनडे सामन्यात ही कसर पूर्ण केली. एकदिवसीय क्रिकेटमधले पहिले शतक झळकावताना तिने 154 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या सामन्यातील या उत्कृष्ट खेळीशिवाय प्रतिका रावलने असा पराक्रम केला आहे, जो याआधी जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला करता आला नाही. तिने 6 वनडे डावांमध्ये विक्रमी धावा केल्या आहेत.
भारत वि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने 3-0 ने असा निर्भेळ विजय मिळवला आहे. सलामीवीर प्रतिका रावलने राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात 154 धावा केल्या. यासह भारतीय महिला क्रिकेट संघाने वनडेत प्रथमच 400 धावांचा टप्पा पार केला. याआधी याच सामन्यात कर्णधार स्मृती मानधनानेही शतक झळकावले होते. एकीकडे स्मृती मानधनाचे हे दहावे शतक होते, तर दुसरीकडे प्रतिकाने वनडेतील पहिले शतक झळकावले.
प्रतिका रावलला आयर्लंड मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. प्रतिका आता भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक खेळी खेळणारी तिसरी फलंदाज ठरली आहे. दीप्ती शर्माने भारतीय महिला संघासाठी सर्वात मोठी एकदिवसीय खेळी खेळली आहे. तिने 2017 मध्ये आयर्लंडविरुद्ध 188 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2017 मध्येच हरमनप्रीत कौरने नाबाद 11 धावांची शानदार खेळी केली होती. आता प्रतिका रावलने 154 धावा करत तिसरे स्थान मिळवले आहे.
प्रतिका रावलने अवघ्या सहा वनडे सामन्यांमध्ये विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. तिने पहिल्या 6 एकदिवसीय डावात एकूण 444 धावा केल्या आहेत. पहिल्या सहा वनडे सामन्यांनंतर कोणत्याही महिला फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. तिने थायलंडच्या नत्थाकन चँथमला मागे टाकले आहे, ज्याने तिच्या पहिल्या सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये 322 धावा केल्या होत्या. प्रतिकाने वेस्ट इंडिजविरूद्धच्या वनडे मालिकेत भारताकडून पदार्पण केले होते.