नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 3-1 ने पराभव केला होता. या मालिकेत भारताची बॅटींग फारशी चालली नव्हती, पण गोलंदाजीत खेळाडूंनी कमाल केली होती. पण या मालिकेनंतर आता टीम इंडियावर दुखापतीचं ग्रहण लागलं आहे.कारण एकामागून एक टीम इंडियाचे खेळाडू दुखापतग्रस्त होतं आहेत. बीजीटी मालिकेदरम्यान बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्यानंतर आता आणखीण एका खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.
बॉर्डर गावस्कर मालिकेच्या शेवटच्या सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला शेवटचा सामना अर्धवट खेळता आला होता. बुमराहच्या या दुखापतीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. त्याच्यानंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे मन जिंकणाऱ्या आकाश दीपला एक महिना मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात आकाश दीपला पाठदुखीमुळे खेळता आले नव्हते. आकाश दीपची दुखापत बंगालसाठी देखील एक धक्का आहे.
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, पाठीच्या दुखण्यामुळे सिडनी कसोटीतून बाहेर पडलेला आकाश दीप सुमारे एक महिना कोणताही सामना खेळू शकणार नाही. त्याला उपचारांसाठी बंगळुरू येथील एनसीए (नॅशनल क्रिकेट अकादमी) येथे जावे लागेल. एनसीएमधील बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर बारकाईने लक्ष ठेवेल आणि आवश्यक उपचार देईल.
दरम्यान 28 वर्षीय आकाश दीपला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यांमध्ये त्याने 5 विकेट्स घेतल्या होत्या. एकूण 7 कसोटी सामने खेळणारा आकाश दीप अद्याप भारतासाठी एकदिवसीय किंवा टी-20 सामने खेळलेला नाही. पण कसोटी सामन्यातील त्याची लय पाहिल्यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही त्याची चाचणी घेतली जाऊ शकते अशी अपेक्षा होती. पण आता त्या आशा संपल्या आहेत.
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 12 जानेवारी रोजी आपला संघ जाहीर करायचा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. भारताचा जसप्रीत बुमराह सध्या दुखापतग्रस्त आहे. मोहम्मद शमीच्या तंदुरुस्तीवरही प्रश्नचिन्ह आहे. अशा परिस्थितीत निवडकर्ते नवीन चेहरे आजमावू शकतात.