Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला जीवेमारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेबाबत सातत्याने पावले उचलली जात आहेत. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर आता सलमान खानच्या गॅलेक्सी अपाट्रमेंटच्या बाल्कनीमध्ये बुलेट प्रूफ काच लावण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेला लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. सलमान खानच्या घराला बुलेट प्रूफ काच लावण्यात आली आहे. तसेच गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सीमा भिंतीवर काटेरी तारही टाकण्यात येत आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. एवढंच नाही तर अत्याधुनिक सुरक्षा उपकरणंही याठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.