प्राण वाचवणाऱ्या ऑटो ड्रायव्हरसाठी प्रसिद्ध गायक मैदानात
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवा
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीला मध्यरात्री त्याच्याच घरात घुसून एका चोरट्यानं चाकूहल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. सैफ अली खानची प्रकृती आता सुधारली असून त्याला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून घरी परतण्यापूर्वी सैफ अली खाननं त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या ऑटो ड्रायव्हरची भेट घेतली आणि त्याचे आभार मानले. तसेच, सैफ अली खान आणि त्याची आई शर्मिला टागोर यांनी ऑटो ड्रायव्हरला 51 हजार रुपयांची भेट दिली. पण, आता बॉलिवूड सिंग मिका सिंहनं पुढे येत ड्रायव्हरचं कौतुक केलं आहे. तसेच, त्याला 1 लाख रुपये देणार असल्याचंही सांगितलं आहे. त्यासाठी ऑटो ड्रायव्हरकडे त्याचे बँक डिटेल्स मिका सिंहनं मागितले आहेत.
मंगळवारी (21 जानेवारी) सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्याच दिवशी त्याची भेट ऑटो ड्रायव्हर भजनसिंह राणाशी झाली. भजन आणि सैफच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिका सिंहनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात म्हटलं आहे की, भजन सिंहला 11 लाख रुपये मिळायला हवेत. त्यानं लिहिलं आहे की, ”भारताच्या आवडत्या सुपरस्टारचा जीव वाचवल्याबद्दल तो किमान 11 लाख रुपयांच्या बक्षीसास पात्र आहे, असं मला वाटतं.” त्याचं काम खरोखरंच कौतुकास्पद आहे. शक्य असल्यास कृपया त्यानं त्याचे बँख डिटेल्स माझ्यासोबत शेअर करावे. मी त्याला 1 लाख रुपये देऊ इच्छितो.”
मिका सिंहनं सैफ अली खानला ऑटो ड्रायव्हरला 51 हजार रुपये दिल्याची पोस्टही शेअर केली आहे. मिकानं म्हटलं आहे की, ”सैफ भाई प्लीज त्याला 11 लाख रुपये द्या… तो रियल हिरो आहे. मुंबई ऑटोवाला जिंदाबाद.” सिंगर मिका सिंहनं केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, सैफनं भेटीदरम्यान भजन सिंहचं कौतुक केलं आणि म्हणाला, ”जर तुम्हाला आयुष्यात कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर मला लक्षात ठेवा. सैफसोबत त्याची आई शर्मिला टागोर यांनीही कृतज्ञता व्यक्त केली.