मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मिस इंग्लंडचा किताब जिंकलेल्या चळश्रश्रर चरसशश हिने हैद्राबादमध्ये सुरु असलेल्या मिस वर्ल्डच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, मिला मॅगीने आता या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, तिने स्पर्धेतून बाहेर पडताना हैद्राबादमध्ये सुरु असलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या आयोजकांवर सनसनाटी आरोप केले आहेत. 24 वर्षीय मिला मॅगीने गेल्या वर्षी मिस इंग्लंडचा किताब जिंकून प्रसिद्धी मिळवली होती, पण आता ती मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेत नाही. कॉर्नवॉल येथील रहिवासी मिला मॅगी ही भारतातील हैदराबाद येथे होणाऱ्या या जगप्रसिद्ध सौंदर्य स्पर्धेत सहभागी होत होती. मात्र,तिने ही स्पर्धा मध्येच सोडून दिली आणि आयोजकांवर गंभीर आरोप केले.
मिस वर्ल्डची स्पर्धा शोषण करणारी
इंग्लिश ब्युटी क्वीनने या स्पर्धेचे वर्णन जुनी आणि ‘शोषण करणारी’ स्पर्धा असे केले. मॅगी म्हणते की, तिला तिथे वेश्या असल्याप्रमाणे वागणूक मिळाली. मॅगीने सांगितले की, मिस वर्ल्डच्या ग्लॅमरस जगामागे एक कटू सत्य लपलेले आहे. तिने द सनला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, श्रीमंत प्रायोजकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धकांना दिवसरात्र जड मेकअप आणि ग्लॅमरस गाऊन घालण्यास भाग पाडले जात असे.
मिला मॅगी म्हणाली की आम्हाला श्रीमंतांसमोर परेड करावी लागली. प्रत्येक टेबलावर 6 पाहुण्यांसाठी दोन मुली बसल्या होत्या आणि आम्हाला संपूर्ण संध्याकाळ त्यांचे मनोरंजन करावे लागले. संतापलेल्या मॅगीने म्हटले की हे पूर्णपणे चुकीचे आहे. ती म्हणाली की मला सामाजिक समस्यांबद्दल आणि बदलांबद्दल बोलायचे होते. मात्र, माझी मतं ऐकण्यात कोणालाही रस नव्हता.
मिस वर्ल्डची स्पर्धा आऊटडेटेड झाली
मॅगी पुढे म्हणाली की, मिस वर्ल्ड स्पर्धेने आधुनिक आणि समतावादी मूल्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. परंतु ते 1960 आणि 70 च्या दशकात अडकले आहेत. त्यांचा उद्देश फक्त लोकांचे मनोरंजन करणे हा होता. मॅगीने 7 मे रोजी हैद्राबादमध्ये झालेल्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये भाग घेतला होता, परंतु 16 मे रोजी वैयक्तिक कारणांमुळे तिने स्पर्धा सोडली. मिस इंग्लंडच्या 74 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धकाने अशा प्रकारे स्पर्धा अर्ध्यावर सोडली आहे. मॅगी म्हणाली, ‘तिथे आम्ही बदल घडवून आणण्यासाठी आणि तरुणांना प्रेरणा देण्यासाठी गेलो होतो, पण आम्हाला तिथे माकडांसारखे बसवण्यात आले. मला आता ते सहन होत नव्हते.
