Spread the love

रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत, पहिल्याच पावसात दाणादाण!

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

राज्यासह आता मुंबईत देखील मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसेच मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा रेकॉर्ड देखील मोडला आहे.

सरासरी मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख 11 जून आहे. यंदा मान्सून 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झाला आहे. यंदा पहिल्यांदाच मान्सून लवकर धडकला. मान्सूनने मुंबई दाखल होण्याचा रेकॉर्ड मोडला. मान्सून याआधी 1956, 1962 आणि 1971 मध्ये 29 मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. मात्र, यंदा पहिल्यांदाच मान्सून मुंबईत लवकर धडकला आहे. मान्सून 26 मे रोजी मुंबई दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे.

रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत-

मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाला आहे. ठाणे ते सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक 40 मिनिटं उशिराने सुरु आहे. ठाणे ते कल्याण जलद आणि धिमी वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. ठाणे रेल्वे स्थानकात काही इंडिकेटर बंद झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. तर काही काळ ठप्प झालेली हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत झाली आहे. मात्र वाहतूक उशिराने सुरु आहे. याशिवाय सीएसएमटी स्थानकात एक्सप्रेस ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी आल्याने काही गाड्यांची वेळ बदलण्यात आलीय. सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी गाडी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी रवाना होणार आहे. तर सीएसएमटी-धुळे एक्सप्रेसही 1 वाजून 40 मिनिटांनी रवाना होणार आहे. तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईतील पावसाचे सर्व अपडेट्‌‍स-

सीएसएमटी स्थानकातील एक्सप्रेस ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी आल्याने काही गाड्या रिशेड्युल्ड

सीएसएमटी हिंगोली जनशताब्दी गाडी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी रवाना होणार

सीएसएमटी धुळे एक्सप्रेस देखील 1 वाजून 40 मिनिटांनी रवाना होणार

केम्स कॉर्नर ते मुकेश चौकच्या दरम्यान रस्ता खचला-

रस्ता खचल्यामुळे अप दिशेतील बस मार्ग क्रमांक 104, 121, 122 ,132,135 हे पेडर रोड, कॅडबरी जंक्शन ,भुलाबाई देसाई मार्गाने 10.30 वाजल्यापासून जे. मेहता कडे जातील.

पनवेल रेल्वे स्थानकावर पाणी साचले-

नवी मुंबई – पनवेल रेल्वे स्थानकातील सबवेमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.

यामुळे प्रवाशांना स्थानकात येण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे.

मुंबईत मे मधला 107 वर्षांतला विक्रमी पाऊस-

मुंबईत आतापर्यंत मे महिन्यात 294 मिमी पाऊस

1918 च्या मे महिन्यात पडला होता 279 मिमी पाऊस

मुंबईत सकाळी 8.30 पर्यंतच्या 24 तासांत 135 मिमी पाऊस

मुंबईच्या उपनगरांत मात्र मे मध्ये आतापर्यंत 197 मिमी पाऊस