Spread the love

नाशिक / महान कार्य वृत्तसेवा

सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेतलेल्या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू-सार्सयांना गुजरातच्या नवसारीतून अटक करण्यात आलीय. नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सुरू असताना नाशिकमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर भागातील सिरीन मेडोज या ठिकाणी राहणाऱ्या 37 वर्षीय विवाहित महिला भक्ती अथर्व गुजराथी हिने 19 मे रोजी घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार मृत महिलेच्या आई-वडिलांनी केल्यानंतर नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात पती सासू-सासरे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणानंतर तिघेही फरार झाले होते. या प्रकरणी भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतल्यानंतर भक्ती गुजराथीचा पती आणि सासऱ्याला गुजरातच्या नवसारीमधून नाशिक पोलिसांनी अटक केलीय.

माहेरून पैसे आणण्यासाठी दिला जात होता त्रास : भक्ती आणि अथर्व यांच्या डिसेंबर 2017 मध्ये प्रेमविवाह झाला होता, विवाहानंतर अथर्व भक्तीला मारहाण करीत बाहेरून पैसे आणण्यासाठी त्रास देत होता. त्याला कंटाळून भक्ती जानेवारी 2025 मध्ये मुलासह माहेरी आली होती, त्यानंतर अडीच महिन्यांनी अथर्वने भक्तीला पुन्हा सासरी नेले आणि 4 मे रोजी भक्तीने पती अथर्व मद्य प्राशन करून त्रास देत असल्याची तक्रार तिच्या भावाकडे केली, त्यानंतर भक्तीचे माहेरचे पुन्हा तिच्या सासरी आले, त्यावेळी अथर्व आणि त्याच्या आई-वडिलांनी समजूत काढून पुन्हा त्रास देणार नाही, असे सांगितले. त्यामुळे नातलग पुन्हा घरी गेले, त्यानंतर सोमवारी 19 तारखेला सकाळी भक्तीने गळफास घेतल्याचे समजले. पती आणि सासरच्या छळाला कंटाळून भक्तीने आत्महत्या केल्याचं भक्तीचे नातेवाईक दिलीप माडीवाले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

मानसिक, शारीरिक त्रास देत असल्याचे व्हॉट्‌‍सॲप चॅट : शवविच्छेदन अहवालानुसार भक्तीने गळफास घेतल्याचे स्पष्ट आहे. तिने व्हॉट्‌‍सॲप चॅटिंगवर मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल मैत्रिणींसह आई-वडील आणि मावशीशी चर्चा केलीय, त्यासह इतर तांत्रिक पुराव्याद्वारे पुढील तपास करीत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी सांगितले.

आरोपींना नवसारीमधून अटक : नाशिकच्या पोलीस गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि अंमलदारांनी तांत्रिक तपास केला, त्यावेळी संशयित पती अथर्व, सासरे योगेश आणि सासू मधुरा जे नवसारीत असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रुचून तिघांनाही अटक केली, यावेळी अथर्वची कार, मोबाईल असा 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.