परळ, हिंदमाता आणि दादर परिसरात साचलं पाणी
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
रविवारी रात्रीपासून मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलीय. सोमवारी पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने बॅटिंग सुरू केल्याने मुंबईकरांची एकच धावपळ उडाली. कुर्ला, विद्याविहार, सायन, दादर, परळ भागासह पश्चिम उपनगरांमध्येही पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असून पुढील काही तास मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस सुरूच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.
मुसळधार पावसाची शक्यता : हवामान खात्याने मुंबईसह किनारपट्टीच्या सर्व भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तासांत पाऊस सुरूच राहू शकतो. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 3-4 तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 50-60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांसह वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगत प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलंय.
मुंबईमध्ये पाणीच पाणी : पहाटेपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता भागात पाणी साचले असून, भायखळा स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. तसेच परळ येथील केईएम रुग्णालयात पाणी शिरले असून रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मंत्रालयाबाहेर गुडघाभर पाण्यातून वाट काढत नोकरदार आणि नागरिकांची त्रेधा उडाल्याचे चित्र आहे.
आपत्ती नियंत्रण कक्ष सक्रिय : मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाचा जोर सुरू आहे. काळे ढग आणि मुसळधार पावसामुळे काही वेळातच पाणी साचण्याची शक्यता असून, महापालिकेने 24द7 आपत्ती नियंत्रण कक्ष सक्रिय केला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केलंय. लोकल सेवा आणि बसेसच्या कामकाजावर पालिकेकडून सतत लक्ष ठेवले जात असून, नागरिकांनी अतिआवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे, असा पालिकेने इशारा दिला आहे. पाणी साचलेल्या भागात जाणे टाळा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेने जारी केलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आलीय.
लोकल वाहतुकीचा वेग मंदावला : मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या गाड्या 5 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद गाड्या 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. धीम्या गाड्याही 5 मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवादेखील काही मिनिटे उशिराने सुरू आहे. त्याचबरोबर पश्चिम मार्गावर गाड्या 5 मिनिटे उशिराने धावत आहेत.
मुंबईतील पावसाचे अपडेट
गांधी मार्केट येथे पाणी भरल्यामुळे दोन्ही बाजूंकडील बसगाड्या भाऊ दाजी मार्गाने परावर्तित करण्यात आलेल्या आहेत.
सायन रोड नंबर 24 येथे पाणी भरल्यामुळे बस मार्ग क्रमांक 341 आणि 312 या अप बाजूंकडील बसगाड्या सायन मेन रोडचा सिग्नल येथून डावीकडे वळण घेऊन यूटर्न घेतील आणि पूर्ववत मार्गस्थ होतील.
वडाळा उड्डाणपुलाखाली पाणी साचल्याने बस मार्ग क्रमांक 117 आणि 174 च्या बसगाड्या वडाळा चर्चमार्गे परावर्तित करण्यात आल्या आहेत.
हिंदमाता येथे पाणी साचल्याने बस मार्ग क्रमांक 40, 212, 368 या दोन्ही बाजूंकडील बसगाड्या शारदा सिनेमाकडून परावर्तित करण्यात आल्या आहेत. केम्स कॉर्नर ते मुकेश चौकादरम्यान रस्ता खचल्यामुळे अप दिशेतील बस मार्ग क्रमांक 104, 121, 122 ,132,135 हे पेडर रोड, कॅडबरी जंक्शन, भुलाबाई देसाई मार्गाने जे. मेहताकडे जातील.
