कृष्णा, वारणा आणि येरळा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या
सांगली / महान कार्य वृत्तसेवा
जिल्ह्यामध्ये गेल्या सात दिवसांपासून सर्वदूर संततधार पाऊस पडत आहे. सात दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तर आता पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे अन् नाले हे भरून वाहू लागले आहेत. तसेच जिल्ह्यातील कृष्णा, वारणा आणि त्याचबरोबर दुष्काळी भागातील असणारी येरळा नदी सध्या दुथडी भरून वाहू लागली आहे.
येरळा नदी सध्या दुथडी भरून वाहू लागली : सांगलीमध्ये कृष्णा नदीची आयोजन पुलाची पातळी ही 15 फुटांवर गेलेली आहे. त्यामुळे सांगलीवाडीचा बंधारा पाण्याखाली गेलाय. हरिपूर या ठिकाणी कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम होतो, या ठिकाणी दोन्ही नद्या आता दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे म्हैसाळ येथील बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे. तर दुसरीकडे कडेगाव-खानापूर आणि तासगाव तालुक्यांतून वाहणारी आणि कोरडी मानली जाणारी येरळा नदी सध्या दुथडी भरून वाहू लागली आहे. वाझर या ठिकाणी येरळा नदीवर असणारा बंधारा तुडुंब भरला आहे. जत तालुक्यामध्येदेखील पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. तालुक्याच्या पूर्व भागासह अनेक ठिकाणी असा मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी सांगली जिल्ह्यामध्ये सरासरी 11 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे.
अनेक ठिकाणी शेतातच भाजीपाला कुजतोय : सात दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याचा मोठा फटका हा शेतीलादेखील बसत आहे. विशेषत: भाजीपाल्याच्या शेतीला संततधार पावसामुळे मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतातच भाजीपाला कुजून जात आहे. द्राक्षबागांनादेखील पावसामुळे फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
