जोतिबा / महान कार्य वृत्तसेवा
गिरोली (ता.पन्हाळा) येथे गायरान जमीनीत विना परवाना खडी पसरून रस्ता केल्यामुळे प्रकरण मिटविणेसाठी लाच मागितल्या प्रकरणी जोतिबा येथील तलाठी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. रमेश मुरलीधर वळीवडेकर (वय ५४ रहाणार उजाळाईवाडी ता.करवीर) असे त्याचे नाव आहे. सोमवारी त्याला लाच लुचपत विभागाच्या पथकाने घरातूनच ताब्यात घेतले असून त्यांच्या विरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांच्या कडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार यांचे शेतात बोअरवेल मारायचे असल्याने बोरची गाडी शेतात येणेसाठी शेजारी असलेल्या गायरान जमीनीत तात्पुरता रस्ता करण्याकरीता खडी पसरवीत होते. यावेळी वळीवडेकर यांना परवानगी न घेता गायरान जमिनीत खडी पसरविली जात असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी पंचनामा करून जेसीबी ताब्यात घेतला. जेसीबी सोडविणेसाठी व पुढील कारवाई टाळण्यासाठी वळीवडेकर यांनी पन्नास हजारची मागणी केली, असल्याची तक्रार लाच लाचपुत विभागाकडे दि ७ एप्रिल रोजी आली होती. तक्रारारीची पडताळणी केली असता वळीवडेकर यांनी तक्रारदार यांचेकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती २५ हजार रुपयाची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत लाच लुचपत विभागाच्या पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सांळूके, सहा. फौजदार सुनिल मोरे, पो.हे. कॉ. सुनिल घोसाळकर, पो.ना. सुधिर पाटील, पो.कॉ सदिप पवार, सहा.फौ.गजानन कुराडे यांनी सहभाग घेतला होता.
