Spread the love

शिरोळ येथे मांग गारुडी समाजाच्यावतीने गुणी विद्यार्थी यासह व्यसनमुक्त तरुणांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

शिरोळ / महान कार्य वृत्तसेवा

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे माणसाला हक्क अधिकार मिळाले. मात्र अजूनही शिक्षणाविना समाजाची वाताहात सुरू आहे. समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित घटकाकडे कोणाचेच लक्ष नाही. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांच्यासाठी चळवळ राबविण्याची गरज असून मांग – गारुडी समाजाने शिक्षणातून प्रगती साधावी असे मत पुरोगामी चळवळीचे युवा नेते दिगंबर सकट यांनी व्यक्त केले.

येथील मांग गारुडी समाज यांच्या वतीने शालेय गुणी विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सकट बोलत होते. सामाजिक चळवळीतील युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एसटी चालकाचा जीवदान दिल्याबद्दल रामा सकट व राहुल लोंढे तसेच व्यसनमुक्त झाल्याबद्दल अजय लोंढे ,विकी सकट , राहूल सकट यांचाही सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात पृथ्वीराजसिंह यादव म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात मांग – गारुडी समाजाने मोठे योगदान दिले असून शिक्षणामुळे समाजाची काही प्रमाणात प्रगती होत आहे. शिक्षणाशिवाय जीवनात परिवर्तन नाही. शिक्षणाला महत्त्व देऊन समाजाने सर्वच क्षेत्रात प्रगती साधावी. याकामी सर्वतोपरी सहकार्य करू असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र प्रधान , राहुल यादव ,श्रीवर्धन देशमुख , आदर्श उपाध्ये लातूर , द्रविड काळे , विनोद आवळे , अनिल लोंढे , विलास सकट यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास अविनाश लोंढे , दत्ता लोंढे ,अजय लोंढे ,अर्जुन सकट ,रोहित सकट, सुमित सकट, अनिकेत लोंढे ,आनंदराज सकट आदि उपस्थित होते. रामा सकट यांनी आभार मानले.