एसएसपीइचा कोल्हापुरात पहिला बळी
हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले येथील ओवी सागर पुजारी या चिमुकलीचा एसएसपीइ (सबक्यूट स्क्लेरोसिंग पॅनेसेफलायटीस) या असाध्य दुर्मिळ आजाराने उपचारा दरम्यान रविवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. गेली सहा महिन्यांपासून ती या आजाराला झुंज देत होती. तिच्या मृत्यूने हातकणंगले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तिला गोवर झाला होता. लसीकरण ही झाल होत. सहा महिन्यापूर्वी तिला फिट आली होती. गावातच उपचार केले. पण फरक पडला नाही. वारंवार फिट येऊ लागल्याने तिला कोल्हापूर येथील खासगी उपचारासाठी दाखल केले. सर्व तपासण्या केल्यानंतर तिला दुर्मिळ इएसपीई विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यावरती जगामध्ये कोणतेच ठोस औषध उपलब्ध नसल्यामुळे वडील सागर हातबल झाले. परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. गुगल वर सर्च करून त्यांनी आजाराची माहिती घेतली आणि चीनमध्ये औषध उपलब्ध असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी थेट थायलंड गाठलं आणि तेथून चीन मधून औषध घेऊन उपचार सुरू केले. काही प्रमाणात प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. परंतु हा दीर्घकालीन औषध उपचार असल्यामुळे यासाठी जवळपास 15 लाख रुपये खर्च येणार होता. ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्षाचे मंगेश चिमटे, कोल्हापूरचे समन्वयक प्रशांत साळुंखे यांच्या माध्यमातून शिंदे यांनी पुजारी यांना तातडीने बोलवून घेऊन भरीव आर्थिक मदत दिली. आणि उपचार सुरू ठेवण्यास सांगितले.
गेली पंधरा दिवसांपासून तिचेवर अस्टर आधार येथे उपचार सुरू होते. चारच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल वरून तिच्या प्रकृतीची चौकशी केली होती आणि डॉक्टरांना योग्य सूचना दिल्या होत्या. उपचार सुरू असताना रविवारी दुपारी अचानक प्रकृती बिघडली आणि साडे चार वाजण्याच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.
