राधानगरी येथे डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन प्रशिक्षण कार्यक्रम
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा
नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते, जमिनीची सुपीकता वाढते आणि ग्राहकांना विषमुक्त अन्न मिळते असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आत्मा यंत्रणा, कृषि विभाग अंतर्गत गुडाळ, तालुका राधानगरी येथे डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन प्रशिक्षण कार्यक्रम झाला. कार्यक्रमास रक्षा शिंदे, प्रकल्प संचालक आत्मा, जालिंधर पांगरे , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व अरुण भिंगारदिवे, उपविभागीय कृषी अधिकारी व आत्मा व कृषि विभागाचे अधिकारी कार्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणेबाबत पालकमंत्री यांनी आवाहन केले. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात देशी गायीच्या पूजनाने झाली. कार्यक्रमात आत्मा विभागाने सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याबाबत प्रात्याक्षिक आयोजित केले होते. हुमणी कीड व्यवस्थापन मोहिम बाबतही प्रात्याक्षिकाद्वारे उपस्थितांना माहिती देण्यात आली. जिल्ह्यातून सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान सेंद्रिय शेतीमध्ये चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आत्मा योजनेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. आत्मा यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान विषयी माहिती मिळत असलेबाबत शेतकऱ्यांनी माहिती दिली व आत्मा विभागाचे आभार मानले.
डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सहभागी लाभार्थ्यांना पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते प्रोत्साहनपर अनुदान अंतर्गत लाभ वितरित करण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी त्यांनी आत्मा अंतर्गत आयोजित प्रशिक्षणामुळे निश्चित शेतकऱ्यांना फायदा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रम आयोजना करिता सहभागी संग्राम पाटील, अद्यक्ष, गुडाळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. रक्षा शिंदे, प्रकल्प संचालक, आत्मा यांनी या प्रशिक्षणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना शाश्वत शेती पद्धती स्वीकारण्यास मदत होईल असे सांगितले तसेच आत्मा विभाग अधिनस्त तालुक्यातील कार्यरत बी.टी.एम व ए.टी.एम यांच्या सहय्याने आत्मा योजना विषयक सुरु असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यास आवाहन केले.
शांतिकुमार पाटील व ऋतुराज चव्हाण या तज्ञ मार्गदर्शकांनी सेंद्रिय शेतीचे विविध पैलू आणि तंत्रज्ञान यावर उपस्थित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये ऊस पाचट, माती परीक्षण महत्व, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, हिरवळीचे खत फायदे, नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकांवरील कीड व रोगांचे नियंत्रण कसे करायचे, याबाबत मार्गदर्शन केले. शेवटी पराग परीट, बी टी एम गगनबावडा यांनी कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांचे आभार मानले.
