Spread the love

जिर्णोद्धारानंतर १५ दिवसातच प्रकार ; वारंवार प्रकार वाढीस 

एकसंबा / महान कार्य वृत्तसेवा

मलिकवाड येथे गेल्या पंधरा दिवसापूर्वी नव्याने जीर्णोद्धार करण्यात आलेल्या मलिकवाड – सदलगा रोडवरील बागेतील महालक्ष्मी मंदिरात शनिवारी मध्यरात्री चोरी झाल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली. मलिकवाडसह परिसरातील अनेक मंदिरामध्ये वारंवार  चोरीचे प्रकार वाढीस लागत असल्याने कार्यवाहीची मागणी होत आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, नुकताच जीर्णोद्धार झालेल्या बागेतील महालक्ष्मी मंदिर परिसरात शनिवारी मध्यरात्री कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची बाब हेरून चोरट्यानी रोड नजीक असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश करत देवीच्या अंगावरील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी निदर्शनास आली. सदरची बाब ग्रामस्थ, मंदिर कमिटी सदस्यांना समजताच मंदिर परिसरात गर्दी झाली होती. मंदिर समितीचे सदस्य राजेंद्र पाटील यांनी सदर घटनेची माहिती सदलगा पोलिस स्थानकाला कळविताच पोलिस सहाय्यक विठ्ठल आणि सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

मलिकवाडसह परिसरातील मंदिरांना चोरट्यांनी लक्ष करत वारंवार चोरीचे प्रकार घडवून आणत आहेत. सदरच्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी झालेल्या चोरीच्या प्रकारानंतर गावातील काही मंदिरांमध्ये सी.सी टीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. मात्र नुकताच जीर्णोद्धार झालेल्या मंदीरात आणखी काही कामकाजानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा विचार मंदिर कमिटीचा असतानाच चोरट्यांनी आपला डाव साधला आहे.

पोलिसांचे गस्तीकडे दुर्लक्ष

सध्या सदलगा पोलिस स्थानकात चोरीचे प्रकरणे वारंवार घडत आहेत. सदरच्या चोरीच्या बाबी अनेकदा नोंद न होताच दुसऱ्याच्या माथी खापर फोडून प्रकरणे तिथेच दाबली जात आल्याचे प्रकार उघडकीस आली आहेत. मात्र पोलिसांनी सद्यात गस्त घालण्याकडे दुर्लक्ष केल्याने भुरट्या चोरट्यांनी आपले लक्ष्य सहज साध्य करत असल्याचे समोर येत आहे. तसेच कोणत्याही चोरीच्या प्रकारांचा तपास वेगाने होत नसून उलघडा होत नसल्याने असा प्रकार वाढीस लागत आहे. यामुळे गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.