Spread the love

कृषी विभागाकडून कीड नियंत्रणासाठी मंडळस्तरावर नाविन्यपूर्ण स्पर्धा व उपाययोजनांचे आयोजन

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा

जिल्ह्यात कृषी विभागामार्फत खरीप हंगामपूर्व हुमणी कीड नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण स्पर्धा व उपाययोजनांचे आयोजन करण्यात आले आहे. २०२५-२६ या वर्षासाठी हुमणी कीड नियंत्रण मोहिमेस सुरुवात झाली असून, यामध्ये शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी केले आहे.

या मोहिमेअंतर्गत हुमणी कीड नियंत्रणासाठी मंडळस्तरीय स्पर्धा राबवण्यात येत असून, स्पर्धेत सहभागी  होणाऱ्या शेतकऱ्यांनी  प्रकाश सापळे  तयार करून व कामगंध सापळे  लावून जास्तीजास्त  हुमनीचे  भुंगेरे पकडून कृषी विभागाकडे  जमा करायचे आहेत. जे शेतकरी  सर्वाधिक भुंगे  पकडून कृषी विभागाकडे जमा  करतील अशा शेतकऱ्यांना आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे . या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२५ आहे. ७ जून २०२५ पर्यंत पकडलेल्या  भुंग्यांच्या वजनावर विजेता घोषित होणार आहे . तरी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी गुडाळ ता. राधानगरी येथे गावातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री यांनी, जिल्ह्यात येणारा खरीप हंगाम हुमणीमुक्त करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. या स्पर्धेमध्ये सहभाग विनामूल्य असून, हुमणी भुंगे गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे व कामगंध सापळे लावणे अनिवार्य आहे. स्पर्धेचा कालावधी ७ जून २०२५ पर्यंत राहणार आहे. पकडलेले भुंगे कृषी विभागाकडे जमा करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, असेही कृषी अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

स्पर्धेतील बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे:

प्रथम क्रमांक: बॅटरी स्प्रे पंप

 द्वितीय क्रमांक: हँड स्प्रे पंप

 तृतीय क्रमांक: चार्जेबल टॉर्च

 उत्तेजनार्थ: पाडेगाव पहार

कृषी विभागाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, वळीव पावसानंतर ऊसावरील प्रमुख कीड असलेल्या हुमणीचे भुंगे सूप्त अवस्थेतून बाहेर पडून ऊस पिकामध्ये अंडी घालतात. त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. यावर उपाय म्हणून, जिथे मोटार पंप तिथे प्रकाश सापळा, तसेच कामगंध सापळे लावावेत.

प्रकाश सापळ्यासाठी लागणारे साहित्य: ५ x ४ फूट आकाराचा प्लास्टिकचा पिवळा कागद, १०० वॅटचा बल्ब, पाणी व कीटकनाशक इत्यादी.  प्रकाश सापळा बसवण्यासाठी मोटारपंपजवळ ५ x ४ फूट आकाराचा व १ फूट खोलीचा खड्डा तयार करावा. त्यावर पिवळ्या रंगाचा प्लास्टिक कागद टाकावा व किटकनाशक मिश्रीत पाणि त्या खड्ड्यात टाकून त्यावर १०० वॅटचा किंवा त्यापेक्षा मोठा बल्ब बसवावा. सापळा संध्याकाळी ६.३०  ते ८.३० वाजेपर्यंत कार्यान्वित ठेवावा. प्रकाशाकडे आकर्षित होणारे भुंगे अंडी घालण्यापूर्वीच कीटकनाशक मिश्रीत पाण्यात पडून मरतील आणि त्यानंतर त्यांचे नियंत्रण शक्य होईल.

कामगंध सापळ्यासाठी लागणारे साहित्य: कामगंध सापळा व ल्युर अनुदानावर / अल्पदरात  कृषी विभागामार्फत उपलब्ध करण्यात येणार आहे.त्यासाठी कृषी विभागाकडे मागणी नोंदवावी . प्रकाश सापळा तयार करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.