Spread the love

रिपब्लिकन ऐक्यासाठी दोन पावलं मागे येण्यास तयार : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

सांगली / महान कार्य वृत्तसेवा

रिपब्लिकन ऐक्यासाठी मी दोन पावले मागे यायला तयार आहे, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत स्पष्ट केले की, सर्वजण एकत्र येण्यासाठी तयार आहेत, फक्त प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा.

सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. त्यांनी सांगितले की, रिपब्लिकन ऐक्य हे समाजाच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, जर आपण सर्वजण एकत्र आलो, तर एक मजबूत आणि परिणामकारक ताकद निर्माण होऊ शकते. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे, असे त्यांनी सुचवले.

“प्रकाश आंबेडकर यांनी पुढे यावे, मी माझ्या पदाचा किंवा प्रतिष्ठेचा विचार न करता दोन पावले मागे यायला तयार आहे. माझ्या पार्टीची ताकद, समाजाची ताकद मी त्यांच्या पाठीशी उभी करेन,” असेही आठवले यांनी ठामपणे सांगितले.

रिपब्लिकन चळवळीच्या विखुरलेल्या गटांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असून, यामुळे दलित समाजाला नवसंजीवनी मिळू शकते. दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र येण्याची तयारी असल्याने, भविष्यात रिपब्लिकन ऐक्य होण्याची शक्यता वाढली आहे. आता प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.