Spread the love

राजापूर बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी खवय्यांची गर्दी

राजापूर / महान कार्य वृत्तसेवा

शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ सध्या मासेमारीसाठी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे बंधाऱ्यावर पाण्याची पातळी २२ फूटांवर पोहोचली असून, गेल्या काही तासांत ती तीन इंचांनी घटली आहे. या पाण्याच्या प्रवाहामुळे विविध प्रकारचे मासे बंधाऱ्याजवळ जमा झाले आहेत, आणि याच संधीचा फायदा घेत राजापूर, खिद्रापूर, अकिवाट गावांतील मासेप्रेमींनी बंधाऱ्याजवळ मोठी गर्दी केली आहे.

“हात घालेल तिथे मासा” अशी परिस्थिती सध्या राजापूर बंधाऱ्यावर पाहायला मिळत आहे. अनेक तरुण मासे पकडून ते इचलकरंजी, कुरुंदवाड येथील बाजारात विक्रीसाठी नेत आहेत. काहीजण आपल्या नातेवाईकांना बोलावून घरीच मासे देत आहेत. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, विशेषतः तरुण वर्ग मोठ्या संख्येने बंधाऱ्यावर उपस्थित होत आहे.

या नैसर्गिक संधीमुळे स्थानिक मच्छीमारांना आणि ग्रामीण भागातील युवकांना थोडा आर्थिक दिलासा मिळताना दिसत आहे. पकडण्यात येणाऱ्या माशांमध्ये किल्ल्यापं, कोयरा, खवले, आरळली अशा प्रकारांचा समावेश आहे.