Spread the love

जालना / महान कार्य वृत्तसेवा

गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांमध्ये नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीने वितरित केलेली 3840 जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली. मात्र, ही प्रमाणपत्रे केंद्र सरकारच्या पोर्टलवर अद्याप कायम आहेत. यामुळे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घरोघरी जाऊन ही प्रमाणपत्रे परत घेण्याची मागणी केली होती. आता शहरी भागात मनपा आयुक्त किंवा मुख्याधिकारी, तर ग्रामीण भागात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी घरोघरी जाऊन ही प्रमाणपत्रे गोळा करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

परप्रांतीयांनी खोट्या कागदपत्रांद्वारे जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी 20 मार्च 2025 रोजी डॉ. पांचाळ यांची भेट घेऊन शासकीय मार्गदर्शक सूचना त्यांच्या निदर्शनास आणल्या होत्या. त्यावर डॉ. पांचाळ यांनी 2024-25 मध्ये वितरित प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. शुक्रवारी सोमय्या यांनी पुन्हा डॉ. पांचाळ यांची भेट घेऊन गेल्या दोन महिन्यांतील चौकशी आणि कार्यवाहीचा अहवाल मागितला आणि रद्द केलेली प्रमाणपत्रे परत घेण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार, सोमवारपासून रद्द झालेल्या प्रमाणपत्रांच्या मालकांच्या घरी जाऊन ती गोळा केली जाणार आहेत.

जालना शहरातील 806 प्रमाणपत्रे

जालना शहरातच अशी 806 प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत. आता ही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून संबंधितांना संपर्क करून ती परत घेतली जाणार आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली.

पुन्हा अर्ज करावा लागणार

यंदा 1 जानेवारी ते 15 मे या कालावधीत फक्त 366 अर्ज प्राप्त झाले, तर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत जन्म प्रमाणपत्रांसाठी 12010 आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी 762 अर्ज तहसील कार्यालयात आले होते. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवरून तहसीलदारांच्या आदेशानुसार प्रमाणपत्रे दिली जातात. ज्यांची जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे रद्द झाली आहेत, त्यांना पुन्हा अर्ज करून तहसीलदारांच्या स्वाक्षरीने नवीन प्रमाणपत्र मिळवता येईल. यासाठी संबंधितांनी तहसील कार्यालयात अर्ज करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी सांगितले.