Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
दोन दिवसांपासून संततधार बरसणार्‍या पावसामुळे येथील गावभागातील नागुमळा परिसरातील भारत बाळकृष्ण सुतार यांचे घराचे संपूर्ण छप्पर कोसळले. यामध्ये सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरी प्रापंचिक साहित्याचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. घराचे छतच पडल्याने सुतार कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे.

गत दोन-तीन दिवसांपासून इचलकरंजी शहर व परिसरात वरुणराजाने दमदार हजेरी लावलेली आहे. गुरुवार दुपारपासून तर पावसाची संततधार कायम असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच पावसामुळे गावभाग परिसरातील नागुमळा येथे वास्तव्यास असलेल्या सुतार कुटुंबियांच्या घराचे संपूर्ण छतच कोसळले. छप्पर पडत असल्याचे अंदाज येताच सुतार कुटुंबातील सदस्य वेळीच घराबाहेर पडल्याने जिवीतहानी टळली. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून यामध्ये प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच पावसाची रिपरिप सुरु असल्याने साहित्य खराब झाले आहे.
घराचे छप्पर कोसळल्याच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने घटनास्थळी गर्दी झाली होती. घराचे छप्पर नाहिसे झाल्याने सुतार कुटुंबिय उघड्यावर पडले आहे. प्रशासनाने वेळीच या दुर्घटनेकडे लक्ष देऊन सुतार कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. शनिवार व रविवारी शासकीय सुट्टी असल्याने प्रशासनाने याचा वेळीच पंचनामा करुन नुकसानीचा अंदाज घेऊन त्याबाबतचा अहवाल मदतीसाठी पाठवावा, असे बोलले जात आहे.