पुलाची शिरोली/महान कार्य वृत्तसेवा
संभापूर (ता.हातकणंगले) येथील एकाच कुटुंबातील दोन चिमुरड्यां भावंडांचा अवघ्या काही तासांच्या अंतराने दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संभापूर तसेच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, वरद सागर पोवार (वय ६), विराज सागर पोवार (वय ४) या दोन भावंडांना पोटदुखी व उलटीचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी पेठ वडगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या नंतर गुरुवारी पुन्हा त्रास होऊ लागल्याने पुन्हा दवाखान्यात दाखल केले. तेथे विराजची तब्बेत अधिकच बिघडली. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला .पारगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करत असताना दुसरा मुलगा वरद याची देखील तब्बेत बिघडल्याने त्याला गुरुवारी रात्री कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्याची ही मृत्यूशी सुरू असणारी झुंज अखेर संपली. आज शुक्रवारी सकाळी वरदचा मृत्यू झाला. अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन भावंडे मृत्यमुखी पडल्याने नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांना हेलावून टाकले. दरम्यान या अनपेक्षित धक्याने त्या मुलांची आई सौ.पूजा सागर पोवार यांची तब्येत बिघडल्याने कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
या दोन मुलांचा मृत्यू कशामुळे झाला याचा खुलासा शवविच्छेदनचा रिपोर्ट आल्यानंतर समजेल. या दोन्ही मुलांना खाण्यापिण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
