Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी सांगली मार्गावर असणाऱ्या  यड्राव फाटा या ठिकाणी  बुधवारी घडलेल्या एटीएम चोरीच्या प्रकाराने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडून सात लाख रुपयांची रोकड लंपास केली. संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत असले तरी यानिमित्ताने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संबंधित एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नव्हता हा निष्काळजीपणा असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे असून, बँकेकडून योग्य सुरक्षा न दिल्याने चोरट्यांना संधी मिळाल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, एटीएम सेंटरची सुरक्षा ही केवळ नावापुरती असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तपास अधिक गतिमान केला आहे. सदर घटनेनंतर बँकांना त्यांच्या एटीएमच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा अशा चोरीच्या घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.