Spread the love

पालघर / महान कार्य वृत्तसेवा

पालघर हा विस्ताराने जरी लहान जिल्हा असला तरी दुर्गम आणि आदिवासीबहुल भाग असल्याने येथील नागरिकांना वाहन नोंदणीसाठी थेट वसई विरार येथे जावे लागत होते; परंतु आता परिवहन मंत्री सरनाईक यांच्या लोक दरबारामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी पालघरला नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, या आश्वासनाची अवघ्या महिनाभराच्या हात अंमलबजावणी सुरू झाली असून, पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झालंय. पालघर जिल्ह्यात चौथी नवी मुंबई विकसित होत आहे. त्याचबरोबर पालघर औद्योगिक वसाहतीत रिलायन्स अनेक मोठे उद्योग गुंतवणूक करीत आहेत. याशिवाय बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, मुंबई-वडोदरा द्रुतगर्ती मार्ग, पालघर-नाशिक महामार्ग असे अनेक महामार्ग पालघरमधून जात आहेत. पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करून श्क 60 ही नवी ओळख पालघरला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहन संख्येचा विचार करून मंजुरी : पालघर जिल्ह्यात होत असलेल्या विविध पायाभूत सुविधांमुळे आगामी काही वर्षात पालघरची लोकसंख्या सुमारे 10 लाखांनी वाढेल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर पालघर परिसरातील वाहनांची संख्या ही वाढणार आहे, ही बाब लक्षात घेऊन पालघर या जिल्ह्याच्या ठिकाणी नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले आहे. परिवहन मंर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पालघर जिल्ह्याच्या नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा विषय मांडल्यानंतर त्यांनीही तात्काळ मंजुरी दिल्यामुळे हे परिवहन कार्यालय सुरू होत आहे.

परिवहन मंर्त्यांकडून आश्वासनांची पूर्तता : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून पालघरला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर केल्यामुळे आमदार राजेंद्र गावित तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय खूपच अडचणीचे : ‘पालघरच्या ग्रामीण भागातील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा या ग्रामीण भागांसाठी विरार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय खूपच अडचणीचे होते, तर या कार्यालयात येण्यासाठी खर्च होत होता. आता पालघरला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाल्यामुळे जनतेची गैरसोय दूर झाली आहे. त्याचबरोबर पालघर या जिल्ह्याच्या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाल्याने पालघरला आता नवीन ओळख मिळाली आहे, असंही पालघरचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये यांनी म्हटलंय.