Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

प्रसिद्ध कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना त्यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या पुस्तकासाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. बानू यांचे ‘हसीना अँड अदर स्टोरीज’ हे पुस्तक दीपा भस्ती यांनी ‘हार्ट लॅम्प’ या नावाने इंग्रजीत अनुवादित केले. या पुस्तकाला आता 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. बानू मुश्ताक यांचे पुस्तक बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. त्यानंतर जगभरातील इतर पाच पुस्तकांना मागे टाकत अखेर त्यांनी हा पुरस्कार जिंकला आहे. मंगळवार 20 मे रोजी लंडनमध्ये 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर करण्यात आला. बक्षीस रक्कम 50 हजार आहे. बानू मुश्ताक आणि दीपा भस्ती बक्षीस रक्कम वाटून घेतील.

बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या कन्नड लेखिका : मिळालेल्या माहितीनुसार, बानू मुश्ताक यांनी त्यांची पहिली लघुकथा 1950 च्या दशकात कर्नाटकातील हसन शहरातील माध्यमिक शाळेत शिकत असताना लिहिली. आज 77 वर्षीय लेखिका, वकील अन्‌‍ कार्यकर्तीने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकून इतिहास रचला. बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या कन्नड लेखिका ठरल्या. मुश्ताक यांचे 2025 चा बुकर पारितोषिक विजेते पुस्तक हार्ट लॅम्प हे 30 वर्षांच्या कालावधीत लिहिलेल्या 12 लघुकथांचा संग्रह आहे. कर्नाटकातील मुस्लिम महिलांचे दैनंदिन जीवन, बुद्धिमत्ता आणि संतुलनाची यात माहिती आहे. हार्ट लॅम्प हा इंग्रजीत अनुवादित केलेल्या सर्वोत्तम कादंबरीमधील पारितोषिक जिंकणारा पहिला लघुकथा संग्रह आहे.

बुकर पुरस्कार जिंकल्यानंतर मुश्ताक यांची प्रतिक्रिया : ”हा क्षण म्हणजे हजारो काजवे एकाच वेळी आकाशात चमकावेत असा वाटतो, मी हा महान सन्मान वैयक्तिक म्हणून नाही तर इतर अनेकांसोबत एकत्रितपणे उठवलेला आवाज म्हणून स्वीकारतो,” असे लंडनमधील टेट मॉडर्न गॅलरीमध्ये झालेल्या समारंभात मुश्ताक म्हणाल्या. दीपा भस्ती या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्या आहेत. ”माझ्या सुंदर भाषेचा किती सुंदर विजय,” असंही त्या म्हणाल्यात. हार्ट लॅम्प हे तीन वर्षांत बुकर पारितोषिक जिंकणारे दुसरे भारतीय पुस्तक आहे. यापूर्वी गीतांजली श्री आणि अनुवादक डेझी रॉकवेल यांनी टॉम्ब ऑफ सँडसाठी 2022 चा बुकर पुरस्कार जिंकला होता.

मुश्ताक कन्नड साहित्याचा प्रमुख आवाज : लेखिका मुश्ताक या पुरोगामी कन्नड साहित्यातील एक प्रमुख आवाज आहेत. त्या महिलांच्या हक्कांच्या कट्टर समर्थक आहेत आणि भारतातील जात आणि वर्ग व्यवस्थेविरुद्ध लिहित असतात. मुश्ताक यांना मदतीसाठी येणाऱ्या महिलांच्या अनुभवांवरून कथा लिहिण्याची प्रेरणा मिळते. या लघुकथा बानू मुश्ताक यांनी 1990 ते 2023 या 30 वर्षांहून अधिक काळ लिहिल्या आहेत.