Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

रतन टाटांच्या 3 हजार 900 कोटींच्या संपत्ती संदर्भातील कायदेशीर मान्यतेसाठी दाखल केलेल्या ‘प्रोबेट’मधील अखेरचा अडसर दूर झालाय. टाटा समूहाच्या ताज हॉटेल्सचे माजी संचालक आणि रतन टाटांचे जवळचे मित्र म्हणून ओळख असलेल्या मोहिनी मोहन दत्ता यांनी रतन टाटांच्या मृत्युपत्रातील अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे रतन टाटांच्या मृत्युपत्रानुसार मोहिनी दत्ता यांच्या टाटांच्या संपत्तीचा एक-तृतीयांश हिस्सा म्हणजेच सुमारे 588 कोटी मिळणार आहेत.

कोण आहेत मोहिनी दत्ता?- मोहिनी दत्ता हे जवळपास 60 वर्ष रतन टाटांसोबत होते. वयाच्या 13 व्या वर्षी जमशेदपूरच्या डीलर्स हॉस्टेलमध्ये दत्तांची टाटांशी पहिली भेट झाली होती. त्यावेळी रतन टाटाही अवघ्या 25 वर्षांचे होते. त्यानंतर टाटांनी दत्ता यांना आपल्यासोबत मुंबईत ठेवून घेतले आणि ते टाटांच्या ‘बख्तावर’ या निवासस्थानी टाटांसोबत राहू लागले. ताज हॉटेलच्या ट्रॅव्हल डेस्कपासून दत्तांनी आपल्या कामाला सुरुवात केली. वर्ष 1986 मध्ये टाटांच्या मदतीनं त्यांनी स्टॅलियन ट्रॅव्हल सर्व्‌ि‍हसेस सुरू केली. पुढे वर्ष 2006 मध्ये हा व्यवसाय ताज हॉटेल्सच्या उपकंपनीमध्ये विलीन झाला. त्यानंतर दत्ता इंडिट्रॅव्हल या नव्यानं स्थापन झालेल्या कंपनीचे संचालक झाले. वर्ष 2015 मध्ये हा व्यवसाय टाटा कॅपिटलकडे गेला आणि त्यानंतर वर्ष 2017 मध्ये थॉमस कुक, इंडियानं तो विकत घेतला.

टाटांच्या मृत्युपत्रात काय म्हटलंय? – 77 वर्षांचे मोहिनी दत्ता हे मृत्युपत्रातील एकमेव लाभार्थी होते, ज्यांनी त्यांच्या वाट्याच्या किमतीबाबत आक्षेप नोंदवला होता. दत्ता यांच्या वाट्याला टाटांनी एक तृतीयांश संपत्ती सोडली आहे. ज्याचा किंमत तब्बल 588 कोटींच्या घरात आहे. तर उरलेल्या दोन तृतीयांश संपत्तीचा वाटा त्यांच्या सावत्र बहिणींना- शिरीन जेजीभॉय (वय 72) आणि डिआना जेजीभॉय (वय 70) यांना देण्यात आला आहे. या दोघी टाटांच्या मृत्युपत्राच्या कार्यवाहक म्हणूनही आहेत. मोहिनी दत्तांच्या सहमतीनंतर टाटांच्या मृत्युपत्राचे कार्यवाहक आता न्यायालयात या मृत्युपत्राला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी (प्रोबेट)ची प्रक्रिया पुढे नेऊ शकतील.

वाद कशासाठी सुरू होता?- मोहिनी दत्ता हे टाटांचे कुटुंबीय नसतानाही त्यांना इतका मोठा वाटा मिळाला होता. जरी मोहिनी दत्तांनी त्यांच्या वाट्याच्या किमतीवर असहमती दर्शवली होती, तरी मृत्युपत्रातील नो-कॉन्टेस्ट क्लॉजमुळे ते याला कायदेशीर आव्हान देऊ शकले नव्हते. या अटीमुळे मृत्युपत्राविरोधात जाणाऱ्या लाभार्थ्यांना आपला हक्क गमावण्याचा धोका असतो. दत्ता यांना टाटांच्या ‘हालेकाई’ या कोलाबा येथील निवासस्थानी बहिणींनी प्रवेश नाकारला होता. त्यांच्या संपत्तीमधील जवळपास सर्व वस्तू या सध्या कार्यवाहकांच्या ताब्यात आहेत. टाटांच्या मृत्युपत्रास प्रोबेट मंजूर केल्यानंतर मोहिनी दत्तांना यांना त्यावर कोणताही वारसा कर लागणार नाही, कारण भारतात वारसावर कोणताही कर लावला जात नाही.

मृत्यूपत्राचा वादा कोर्टात कसा पोहोचला?- मृत्यूपत्राच्या कार्यवाहकपदी असलेल्या बहिणींनी 27 मार्च 2025 रोजी प्रोबेट मिळवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयानं याबाबत कोणी वारस असहमत असेल तर त्यांच्यासाठी जाहीर सूचना देण्याचे आदेश दिले होते. 9 एप्रिल रोजी त्यांनी यात ‘ओरिजिनेटिंग समन्स’सुद्धा दाखल केली होती. जे मृत्युपत्र आणि लाभार्थ्यांशी संबंधित मुद्दे न्यायालयात मांडण्यासाठी वापरले जातात.