पोलीस व सहाय्यक निबंधक म्हणतात तक्रार आल्यावर कारवाई करू ?
जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा
जयसिंगपूर शहर नव्याने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जात आहे. 2005 साली कृष्णा, वारणा व पंचगंगा नदीला आलेल्या महापुरानंतर शिरोळ तालुक्यातील अनेक गावातील नागरिक जयसिंगपूर मध्ये स्थलांतरित झाले आहेत. यामुळे शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. त्याचबरोबर तंबाखू बाजारपेठ, दगडी खण, स्टोन क्रशर व्यवसायामुळे बाहेरून आलेल्यांची ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शहरामध्ये आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असते, या आर्थिक उलाढाली मध्ये शहरामध्ये खाजगी सावकारकी फोफावली असल्याचे चित्र आहे. मात्र या खाजगी सावकारांना आवर घालणारे कोणीच राहिले नसून तक्रार आल्यानंतर कारवाई होणार असेही प्रशासनाकडून सांगितले जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत असुन अनेक जण आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र शहरांमध्ये पाहायला मिळत आहे.
वैद्यकीय, राजकीय, व्हाईट कॉलर म्हणून समाजात वावरणारे अनेक खाजगी सावकार शहरांमध्ये कार्यरत आहेत महिन्याला पाच, दहा, वीस टक्क्यापर्यंत व्याजाने पैसे वितरित केले जातात या पैसे घेणाऱ्यांच्या मध्ये काही भाजीपाला विक्रेते दोन नंबर वाले व आर्थिक अडचणीत आलेले असतात. आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काहींनी वेळप्रसंगी महिन्याला वीस टक्के प्रमाणे व्याज देऊन व्याजाचे पैसे घेतले असल्याचा प्रकार शहरांमध्ये घडत असल्याची चर्चा आहे. अनेकांनी या खाजगी सावकारांच्या विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना धमकी देण्यात येते अशीही चर्चा शहरामध्ये आहे यामुळे सहसा खाजगी सावकारांच्या विरोधात कोणी तक्रार करत नाहीत आणि पोलीस प्रशासन व सहाय्यक निबंधक तक्रार आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करू असे सांगत असल्याची चर्चा शहरामध्ये आहे यामुळे शहरातील खाजगी सावकारी संपणार कशी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
