यळगूड / महान कार्य वृत्तसेवा
अचानक कृषी सेवा केंद्रावर धाडी, पटापट गोळा केलेल्या खते बी बियांच्या आणि औषधांच्या सॅम्पल आणि त्या फेल गेल्या. तर कोर्टाच्या पायरीची भीती, भीतीने तोडपाण्यासाठी दुकानदारांनी गोळा केलेले हजारो रुपये परस्पर पंटरनेच खाल्याचा राग आणि त्यातून पुन्हा सुरु झालेल्या धाडी असा काहीसा प्रवास या घटनेचा आहे .
झालं असं की हुपरी आणि परिसरातील शेतीसाठी लागणारी खते, औषधे आणि बी – बियाणे विक्री करणाऱ्या अनेक दुकानात मार्च एंडिंगला जिल्ह्यातील शेतीची काळजी घेणाऱ्या जिल्ह्याच्या साहेबाने अचानक भेट देऊन येथील अनेक दुकानातील खतांच्या, औषधांच्या, आणि बी बियाणांच्या वेगवेगळ्या सॅम्पल गोळा केल्या आणि पुणे बेंगलोर महामार्गावरून आपल्या कार्यालयाकडे कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाला.
अचानक झालेल्या या कार्यवाहीने पाचावर धारण बसलेले दुकानदार गोंधळून गेले आणि त्यांनी सुरु केली . शहानिशा यामध्ये दुकानदारांना असं आढळळून आलं की सॅम्पल फेल गेली की न्यायालयीन लढाई सुरु होईल आणि ती किती वर्षे चालेल याची शास्वती नाही, अशी भीती दुकानदारांना घालण्यात आल्याचे समजते. मग भीतीने गाळण उडालेल्या दुकानदारांनी तोडपाणी करून प्रकरण रफादफा करण्याचे ठरवून प्रत्येकी पाच हजार असे हजारो रुपये साहेबाच्या हस्तकाला पुणे बेंगलोर हायवेवरील लक्ष्मी टेकडी जवळील एका कॉलेजसमोर देण्यात आले. मात्र ही रक्कम साहेबाला मिळालीच नाही, तर ती रक्कम ज्याने स्वीकारली त्यानेच हडप केली असे समजते. म्हूणन चिडलेल्या साहेबाने आता पुन्हा अचानक धाडी टाकायला सुरवात केली आहे .
पुन्हा सॅम्पल गोळा केली जात असल्याने दुकानदारांनी साहेब परवा झालय की सगळं आणि हे नवीन काय विचारायला सुरवात केली यावर परवाचा आणि माझा काय संबंध नाही, असे सांगण्यात आल्याचे समजते. मात्र दुकानदार गप्प बसतील तर नवलच यातील काही दुकानदार असल्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्याची खोलवर माहिती काढणाऱ्या लोकांशी संपर्कात आहेत. महत्वाचे म्हणजे ज्या लोकांशी दुकानदारांनी संपर्क केला आहे. ती लोकं जणू काय आपलीच फसगत झाली असल्यागत या प्रकरणाची माहिती गोळा करायला सुरवात केली आहे.
एव्हाना एक दोन माहिती अधिकाराचे अर्ज देखील कदाचित संबंधित कार्यालयाला प्राप्त झाले असतील . मात्र पैशाचा सौदा झाला, ते पैसे कोणी घेतले, मार्चमध्ये झालेली कारवाई खरी होती का खोटी होती आणि आता सध्या सुरु असलेली कारवाई सुद्धा खरी म्हणावी की खोटी असे सगळे प्रश्न सुटले नसताना दुकानदारांनी आपल्याला फसवल्याचा बदला घेण्यासाठी नेमलेले लोक यावरून हे प्रकरण भलतिकडेच भरकटत असल्याचे दिसून येत आहे. किमान वस्तूस्थिती लोकांना माहीत असावी यासाठी या प्रकरणात कुठेही शेतकरी हित दिसून येत नाही हे कळायला हवे यासाठी आता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकारची चौकशी करून सत्य समोर आणले पाहिजे त्याशिवाय या विभागातील भानगड उजेडात येणार नाही अन्यथा असली प्रकरणे दडपण्यासाठी शेतकऱ्यांचाच अगोदर रिकामा असलेला खिसा फाटेपर्यंत रिकामा होत राहील.
