Spread the love

दोघांना अटक, सौदी कनेक्शनचा तपास सुरू

हैदराबाद / महान कार्य वृत्तसेवा

तेलंगणा आणि आंध प्रदेश पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नामुळे बॉम्बस्फोट करण्याचा दोन तरुणांचा कट उधळला आहे. तपास यंत्रणांनी विजयनगरम येथील सिराज उर रहमान (29) आणि सिकंदराबाद येथील बोईगुडा येथील सय्यद समीर (28) या दोघांना अटक केली आहे. ते दोघे सौदी अरेबियातील हँडलरच्या मार्गदर्शनाखाली विजयनगरममध्ये बॉम्बस्फोटाचा कट रचत होते.

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दोघांनी अल हिंद इत्तेहादुल मुस्लिमीन (अहिम) नावाची स्वयंघोषित दहशतवादी संघटना स्थापन केली. संघटनेचा प्रमुख सिराज होता. तर समीर त्याचा उपाध्यक्ष होता. अभियांत्रिकी पदवीधर असलेला सिराज ग्रुप-2 च्या परीक्षांची तयारी करण्यासाठी हैदराबादला गेला होता. मात्र, त्यानं परीक्षेची तयारी न करता दहशतवादी कारवायांवर चर्चा करण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केली.

सौदी हँडलरनं इन्स्टाग्रामद्वारे दिल्या सूचना- दोघेही तरुण सौदी अरेबियातील अज्ञात दहशतवादी हँडलरच्या संपर्कात होते. इन्स्टाग्रामचा वापर करून हँडलरनं दोघांना दहशतवादी कट रचण्याचा आणि स्फोटके बनवण्याचं मार्गदर्शन केलं. त्यासाठी सिराज आणि समीरनं ऑनलाइन पोटॅशियम क्लोरेट आणि सल्फरसारख्या घातक रसायनांची खरेदी केली. तर इंटरनेटद्वारे बॉम्ब बनवण्याच्या तंत्राची माहिती करून घेतली. 21 किंवा 22 मे रोजी विजयनगरममध्ये त्यांनी डमी स्फोट घडवण्याची योजना आखली होती. सिराज आणि समीरनं यांनी त्यांच्या दहशतवादी कृत्यासाठी अल्पवयीन मुलांसह 28 इतर व्यक्तींची भरती केली होती.

एनआयएकडून चौकशी सुरू-

तेलंगणातून मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे, आंध प्रदेश पोलिसांनी शनिवारी विजयनगरममधील सिराजच्या निवासस्थानी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी स्फोटक रसायने जप्त केली. तर समीरला सिकंदराबादमध्ये अटक करण्यात आली. ट्रान्झिट वॉरंटवर त्याला विजयनगरममध्ये नेण्यात आलं. 12 मे रोजी विजयनगरममध्ये सिराजने बॉम्बची चाचणी केल्याचा तपाससंस्थांना संशय आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) सौदी हँडलर आणि मोठ्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. सिराजचे वडील आणि भाऊ करतात पोलिसात नोकरी- सिराज दहशतवादी कृत्याकडं वळाल्यानं त्याच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. त्याचे वडील सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) आहेत. तर त्याचा भाऊ कॉन्स्टेबल आहे. कुटुंबाला सिराज पोलीस दलात सामील होईल, अशी अपेक्षा होती. त्याऐवजी, तो ऑनलाइन कट्टरपंथी लोकांच्या प्रभावाखाली येऊन दहशतवादी कृत्याकडं वळाला.