Spread the love

पती जखमी, दोन बालके बचावली

आजरा / महान कार्य वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील मडिलगे गावात काल रात्री धाडसी दरोडा पडला.यामध्ये एका विवाहीतेचा खून झाला आहे. सुमारे १४ तोळे सोने व रोख रक्कम ९० हजार लंपास केली आहे. पूजा सुशांत गुरव (वय ३३) असे मयत महिलेचे नांव आहे तर पती सुशांत सुरेश गुरव (वय ३६) जखमी पतीचे नांव आहे.

 मडिलगे येथील गुरव गल्लीतील भरवस्तीत अज्ञात चार चोरट्यांनी दरोडा घातला. सुमारे १४ तोळे सोने व रोख रक्कम ९० हजार लंपास केली आहे. हल्ल्यात दीड वर्षाची दोन जुळी मुले बचावली आहेत. ही घटना शनिवारी रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, रात्री अडीच वाजता सुशांत घरामागील बाथरूमसाठी गेले होते.त्यामुळे घराच्या मागील दरवाजे उघडे होते. याचा फायदा घेत अज्ञात ४ चोरट्यांनी घरात प्रवेश केला व मागील दरवाजा लावला. मुलांच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे सुशांत नी पूजा यांना आवाज दिला. मात्र मुले अधिकच रडत असल्याने सुशांत आले. मात्र दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांना समजले. दरवाजाला जोराने धक्का दिल्यामुळे दरवाजा उघडला. अज्ञात चोरट्या पैकी एकाने सुशांत यांना धरत हाताच्या कोपऱ्याने पाठीवर मारहाण केली. खोलीच्या आतील बाजूस पूजा यांच्या कडील सोने व रक्कम हिसकावताना झटापट झाली. यावेळी त्यांच्या डोक्यावर  प्रहार केला. यानंतर अंगावरील दागिने, दागिने व रोख रक्कमेची बॅग घेऊन मागील दाराने चोरटे पसार झाले. रक्तबंबाळ झालेल्या पूजा यांचा जागीच मृत्यू झाला. सुशांत दोन्ही मुलांना काखेत घेवून बाहेर येऊन आरडाओरडा केला. 

दुपारी बेडसिट विकण्यासाठी कांही अज्ञात दोन इसम आले होते. त्यांच्याकडून खरेदी केली. यावेळी त्यातील एक इसम लघुशंकेसाठी बाहेर गेला होता. त्यांच्या देहयष्टी सारखीच हल्ल्यातील चोरट्यांची असल्याचे सुशांत यांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर हे दाखल झाले. स्टेला या श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र हे श्वान घराभोवतीच घुटमळले. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले. घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले यांनीही घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी सारे गांव जमले होते.पूजा यांचे माहेर अतिग्रे (ता. हातकणंगले) आहे.

  • २००५ च्या घटनेची आठवण झाली 

    मार्च २००५ मध्ये अशीच घटना झाली होती.या दरोड्यात चोरट्यांनी वृद्ध राणू येसणे व जनाबाई येसणे या पतीपत्नीचा खून केला होता.यातील मारेकरी आज अखेर सापडलेले नाहीत.आजच्या घटनेने त्या घटनेला उजाळा मिळाला.

  • दोन बालकांना पाहून सर्वच हळहळले 

या हल्ल्यात चोरट्यांनी दीड वर्षाच्या जुळ्या मुक्ता व सोपान यांना सोडले. या बालकांना घेवून कुटुंब महिला दुसऱ्या घरातील खोलीत बसून होत्या.या दोन बालकांना पाहून अनेक जणांच्या डोळे पाणावले. लग्नानंतर चार पाच वर्षांनंतर ही जुळी मुले जन्मली यामध्ये एक मुलगा तर दुसरी मुलगी आहे. यांच्या वाढदिवसाला सुशांत यांनी मोठा कार्यक्रम घेत धार्मिक पुस्तके भेट दिली होती.