Spread the love

पाच कोटींचा मुद्देमाल जप्त

पालघर / महान कार्य वृत्तसेवा

नालासोपाऱ्यातील प्रगती नगर या परिसरातून तुळींज पोलिसांनी मॅफेड्रिन ड्रग्सचा कारखाना उद्ध्‌‍वस्त केलाय. हा कारखाना चालवणाऱ्या एका नायजेरियन महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनास्थळावरून पोलिसांनी 5 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. त्यामुळे नालासोपाऱ्यात ड्रग्स मोठ्या प्रमाणात तयार होत असून, विक्रीदेखील होत असल्याचं समोर आलंय. एका इमारतीमध्ये घरात ड्रग्सचा कारखाना सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.

5 कोटी 60 लाख 40 हजार 150 रुपये इतका मुद्देमाल पोलिसांकडून जप्त : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील नालासोपारा ड्रग्सच्या विळख्यात अडकल्याचं अनेक वेळा समोर आलंय. या अगोदरदेखील अमली पदार्थ विरोधी पथकाकडून नालासोपारा भागात ड्रग्स विरोधात अनेक मोठ्या कारवाया करण्यात आल्यात. तुळींज पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल फड यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता नालासोपारा पूर्वेकडील अंशीत प्लाझा रूम नं. 405 प्रगती नगर या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. चक्क घरात ड्रग्सचा कारखाना सुरू असल्याचे आढळून आलंय. यावेळी घटनास्थळी ठखढअ ऋअढख घणठएइएथएख वय वर्षे 26 या नायजेरियन महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिच्या घरातून मॅफेड्रिन ड्रग्स बनवण्याकरिता लागणारा कच्चा माल, ड्रग्स बनवण्याचे साहित्य असे एकूण 5 कोटी 60 लाख 40 हजार 150 रुपये इतका मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय. संबंधित नायजेरियन महिलेला पोलिसांनी अटक केली असून, तिला सहकार्य करणारा मुख्य सूत्रधार तिचा प्रियकर फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ड्रग्स सेवन करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढतेय : शुक्रवारी तुळींज पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलीय. ज्या नायजेरियन महिलेला पोलिसांनी अटक केलीय. तिच्याकडे भारतामध्ये वास्तव करण्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा आढळून आलेला नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देशभरात ड्रग्सच्या जाळ्यात युवा पिढी मोठ्या प्रमाणात अडकल्याचं पाहायला मिळतंय. कॉलेजच्या युवांपासून ते अभिनेत्यापर्यंत ड्रग्स सेवन करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामधील नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिकांची संख्या आहे. ड्रग्स तयार करून विक्री करत असल्याचे अनेक नायजेरियन लोकांना या अगोदरदेखील पोलिसांनी अटक केलीय.

ड्रग्सच्या विक्रीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल : नालासोपारा परिसरात शेकडो नायजेरियन नागरिक राहत आहेत. त्याची माहिती पोलिसांकडे आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या ड्रग्सच्या विक्रीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून, नालासोपारा परिसरात अनधिकृतरीत्या राहणाऱ्या नायजेरियन लोकांची कोम्बिंग ऑपरेशन करून पोलिसांनी तपासणी करणे गरजेचे आहे. अनेक अनधिकृतरीत्या वास्तव करणारे नायजेरियन लोक समोर येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका नायजेरियन महिलेला अटक : आमच्या पथकाने ड्रग्सचा कारखाना उद्ध्‌‍वस्त केलाय. या कारवाईमध्ये 5 कोटी 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका नायजेरियन महिलेला अटक केली असून, अजून एक आरोपी फरार आहे. तसेच त्याचा शोध घेत आहोत. पुढील तपास सुरू आहे, अशी प्रतिक्रिया तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी दिली.