Spread the love

गुन्हा दाखल झाल्यापासून एजाज फरार

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

वादग्रस्त अभिनेता एजाज खानला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. बलात्काराच्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी एजाजनं दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज कोर्टानं फेटाळून लावलाय. ‘हाउस अरेस्ट’ या ओटीटीवरील शोवरून गुन्हा दाखल झालेला असतानाच, एजाजविरोधात बलात्काराचा अधिक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. याच शोमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून एजाज खाननं बलात्कार केल्याचा आरोप एका 30 वर्षीय महिलेनं केला आहे.

मुंबई पोलिसांचा एजाजच्या जामीनास तीव विरोध : एजाज खाननं लग्नाच्या बहाण्यानं या महिलेला आर्थिक आणि व्यावसायिक मदतीचं आश्वासन देऊन अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी एजाज खानच्या अटकपूर्व जामीन अर्जाला कोर्टात तीव विरोध केला. जर त्याला जामीन मिळाला तर एजाज खान पुराव्यांशी छेडछाड करू शकतो. तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच एजाज खान फरार झाला आहे. त्याने आपला फोन देखील बंद ठेवला आहे. मुंबई पोलीस एजाज खानच्या शोधात आहेत. याप्रकरणी आता एजाज खानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करणे आवश्यक आहे. हा मुंबई पोलिसांनी केलेला दावा मान्य करत कोर्टाने एजाज खानला कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्याची याचिका फेटाळून लावली.

काय आहे प्रकरण : तक्रारदार महिला एक अभिनेत्री असून तिने याबाबत चारकोप पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली होती. उल्लू या ओटीटी ॲपवर सुरू असलेल्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोमध्ये काम देण्याचे अमिष देत एजाजने या महिलेशी जवळीक साधली. या शोच्या शूटिंग दरम्यान एजाजने तिला प्रपोज केले आणि त्यानंतर एजाज त्या महिलेच्या घरी तिला भेटण्यासाठी गेला. तिथे त्याने महिलेवर तिच्या इच्छेविरोधात बलात्कार केल्याचा आरोप महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. तसेच आधी धर्मांतर कर मग लग्न करू असे एजाजने वचन दिल्याचा दावाही महिलेनं तक्रारीत केला आहे. या महिलेच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी एजाज विरोधात भारतीय न्यायसंहिता बीएनएस मधील कलम 64, 64(2 श्), 69, 74 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून मुंबई पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत.