बीड / महान कार्य वृत्तसेवा
बीडमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही, असंच म्हणण्याची वेळ सामान्य नागरिकांवर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यात नव्हे तर, देशात चर्चेत असताना पुन्हां एकदा असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडवरून एसटीनं प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरात घडली आली आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसटीमधून उतरवत केली मारहाण : बीडवरुन अंबाजोगाईला जाणाऱ्या बसमध्ये थुंकल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्याचा एका महिलेशी वाद झाला. ही एसटी अंबेजोगाई शहरात पोहोचली. त्यावेळी चार तरुण एसटीमध्ये घुसले. त्यांनी बसमध्ये घुसताच विद्यार्थ्यासह त्याच्या मित्राला मारहाण करण्याला सुरूवात केली. यावेळी एसटीचे वाहक आणि चालक यांनी विद्यार्थ्याला आणि त्याच्या मित्राला होत असलेली मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचं न ऐकता त्या चौघांनी दोघांना एसटीमधून खाली उतरवत मारहाण सुरूच ठेवली. या मारहाणीत संदेश सावंत हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याचा मित्र राहुल केंद्रे याच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ॠषी शिंदे, लखन जगदाळे, निकेश जगदाळे आणि बालाजी जगदाळे या चौघांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी केली जबर मारहाण : एसटी बसमधून खाली उतरवून चौघांनी दोघांना बेदम मारहाण केली. यात संदेश सावंत हा तरुण गंभीर जखमी झाला. यानंतर त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अंबाजोगाई शहरात एसटीमधून उतरल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी बेदम मारहण केली, असं त्यांनं सांगितलं. अंबाजोगाई शहर पोलिसांनी या प्रकरणातील तिघांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, एक आरोपी फरार आहे.
फरार आरोपीचा तपास सुरू : विद्यार्थी आपल्या मित्रासोबत बीडमधून येत असताना एसटी मधून उतरल्यानंतर चारजणांनी त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर विद्यार्थ्याचं अपहरण केलं. या घटनेनंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळी असलेले गोपनीय व्यक्ती यांच्याकडून माहिती घेतली. यानंतर आरोपींची नावं निष्पण्ण झाली. यानंतर या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, एक आरोपी फरार आहे. त्याच्या तपासासाठी एक पथक रवाना झालं आहे. त्याचा शोध घेऊन त्यालाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी दिली.
