Spread the love

दुसऱ्या खटल्यात दाऊदच्या हस्तकाला जामीन

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीला मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा देत त्याची 2008 मधील खंडणी प्रकरणातून निर्दोष सुटका केली. मात्र, गवळी कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे गवळीची तुरुंगातून सुटका होणार नाही. त्याचा मुक्काम कारागृहातच राहणार आहे.

काय होतं प्रकरण? मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मकोक्का न्यायालयानं खंडणीच्या एका प्रकरणातून पुराव्यांअभावी अरुण गवळीची निर्दोष सुटका केली आहे. याप्रकरणी गवळीसह त्याचा धाकटा भाऊ विजय अहिर आणि अन्य पाच आरोपींचीही या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणी एकूण नऊ आरोपींना अटक झाली होती. त्यापैकी एकाचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. तर एकाला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं होतं.

काय आहे न्यायालयाचा निर्णय? या प्रकरणात आरोपींवरील खंडणीचा गुन्हा सिद्ध करण्यात तपासयंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचा ठपका न्यायालयानं ठेवला. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत स्थापन (मोक्का) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी आरोपींची निर्दोष सुटका करताना स्पष्ट केलं की, सरकारी पक्षानं आरोपींविरोधात न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनी आरोप सिद्ध होत नाहीत. त्यामुळे आरोपींना मोक्कांतर्गत गुन्ह्यांसाठी दोषी ठरवता येणार नाही.

दाऊदच्या एका हस्तकालाही जामीन मंजूर- दरम्यान कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीनला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. फेब्रुवारी 2020 मधील दाखल खंडणीच्या प्रकरणात अटकेत असलेला तारिक परवीन हा गेल्या पाच वर्षांपासून नवी मुंबईतील तळोजा कारागृहात होता. मात्र, हा खटला लवकर पूर्ण होण्याची शक्यता नसल्यानं खटल्याविना कारावास म्हणजे शिक्षा ठोठावल्यासारखंच आहे. गुन्हा सिद्ध झाला तर आरोपीला शिक्षा नक्कीच होईल. मात्र, आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आरोपी हा निर्दोषच असतो. याप्रकरणी आरोपीनं कोणत्याही खटल्याविना पाच वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानं तो जामीनास पात्र असल्याचं स्पष्ट करत उच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला आहे.

अरुण गवळीवर कोणाच्या हत्येचा आहे आरोप – मुंबईत 2 मार्च 2007 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी अरुण गवळीला अटक केली होती. तेव्हापासून गवळी कारागृहात आहे. अरुण गवळीवर मारामारी, अपहरण, खून यासारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत.