Spread the love

इचलकरंजीमध्ये निवडणूकीच्या पार्श्वभूवर प्रमुखांची बैठक

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत खासदार तसेच आमदारांनी दिलेला शहरातील विकासकामांविषयीचा शब्द पूर्ण केलेला नाही. महापालिकेच्या माध्यमातूनचही नागरी प्रश्न सुटत नसल्याने महाविकास आघाडीकडून यापूर्वी वारंवार आंदोलने करुन आवाज उठवण्यात आला आहे. महापालिकेत लोकप्रतिनिधी असल्याशिवाय प्रश्नांची तड लागत नाही. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकसंधपणे व शक्य झाल्यास व्यापक आघाडी करुन निवडणुकीला सामोरे जाईल अशी माहिती महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली.

महाविकास आघाडीच्यावतीने गुरूवारी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहर काँग्रेस कमिटीमध्ये राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, माजी आ.राजीव आवळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे, सागर चाळके, राहुल खंजिरे, शशांक बावचकर, शिवसेनेचे शहरप्रमुख सयाजी चव्हाण, कॉ.भरमा कांबळे, सदा मलाबादे, रणजीत जाधव, प्रकाश मोरबाळे, मलकारी लवटे, अब्राहम आवळे आदींनी माहिती दिली.

ते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकसंधपणे  लढत दिली. त्याच पध्दतीने महापालिका निवडणुकीतही एकत्रीतरित्या लढू. शहरातील समस्यांच्या निराकरणासाठी सातत्याने लढा सुरू आहे. खासदार, आमदारांनी पाण्यासह अन्य प्रश्न मार्गी लावलेले नाहीत. कृष्णा नळपाणी योजनेचे जलवाहिनी बदलण्याचे काम अपूर्ण आहे. सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाची निविदा न्यायालयाने रद्द केल्याने महापालिकेला नामुष्की पत्करावी लागली आहे. महापालिकेच्या कारभारात लोकप्रतिनिधींची हस्तक्षेप वाढत आहे. महापालिकेचा कारभारही समाधानकारक नाही. ऑनलाईन सेवा आठ दिवसांपासून ठप्प आहे. जून उजाडत आला तरी कर वसुलीसाठी हालचाली नाहीत. अन्य प्रश्नांबाबतही दुर्लक्षच आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी भागात सर्व्हे करुन सक्षम उमेदवार देण्यात येतील.

दरम्यान व्यापक आघाडीचे सुतोवाच इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व पक्षामधील नेत्यांनी एकत्र येवून शहर विकास आघाडीचा प्रयोग राबवला होता. त्याच धर्तीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून येईल त्याला सोबत घेवून व्यापक आघाडी बनवून एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्याचे सुतोवाच बैठकीत करण्यात आले.

भाजपा मध्ये मतभेद माजी आमदारांच्यात सुंदोपसुंदी माजी आ.प्रकाश आवाडे व माजी आ.सुरेश हाळवणकर हे दोघेही भाजपमध्ये एकत्रीत असले तरी त्यांच्यातील मतभेद लपून राहिलेली नाही. विविध कारणांवरुन त्यांच्यातील अंतर्गत धुसफूस नेहमीच समोर येत असते, अशी टिका करताना सागर चाळके यांनी महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येवून शहरवासियांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम पर्याय देवू, असे सांगितले.