Spread the love

तिसऱ्या आघाडीची शक्यता ; राजकीय मोर्चेबांधणी

पेठवडगाव / महान कार्य वृत्तसेवा

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घेण्याचे निर्देश नुकतेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.त्यामुळे या निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वडगाव नगरपालिका निवडणुकीतून सत्ता काबीज करण्यासाठी  स्थानिक पातळीवर पारंपरिक यादव ,सालपे या आघाड्यांसह नव्याने राजकीय आखाड्यात येवू पाहणाऱ्या नेतेमंडळींनी विविध माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असल्याचे दिसत आहे. त्यातच आता तिसऱ्या आघाडीची शक्यता निर्माण झाली आहे.

हातकणंगले तालुक्यात पेठ वडगांव शहर राजकीय संवेदनशील म्हणून ओळखले जाते.इथल्या राजकीय घडामोडींचा परिणाम तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था , सहकार संस्थांच्या सत्ता बदलावर झाल्याचा अनुभव जनतेला अनेकदा आला आहे.एकंदरीत ,

वडगाव पालिकेवर बरीच दशके विजयसिंह यादव यांची एकहाती निर्विवाद सत्ता होती. १९८५ साली शिवाजीराव सालपे यांनी युवक क्रांती आघाडी निर्माण करतानाच यादव विरोधकांची मोट बांधून यादव यांच्या सत्ता साम्राज्याला जोरदार धक्का दिला होता. तेव्हापासून वडगाव नगरपालिकेचे सत्ता केंद्र यादव आघाडी व युवक क्रांती आघाडी या स्थानिक आघाडींभोवतीच फिरत राहिले आहे.

 १९९१, २००१, २०१६ मध्ये पालिकेची सत्ता युवक क्रांती आघाडीकडे होती. तर, १९९६, २००६, २०११ मध्ये यादव आघाडीची सत्ता होती. सध्या यादव आघाडीचे नेतृत्व विद्याताई पोळ यांच्याकडे आहे. तर युवक क्रांतीने २०१६ पासून सामूहिक नेतृत्व स्वीकारले आहे. प्रवीता सालपे, रंगराव पाटील, सुकुमार पाटील, अजय थोरात हे या आघाडीची धुरा सांभाळत आहेत. लवकरच होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांनी विविध माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

स्वपक्षातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्याबरोबरच विरोधी गटातील कार्यकर्त्यांची फोडाफोडी करण्याचे धक्कातंत्र वापरले जात आहे. युवक क्रांती आघाडीच्या एका नेत्याला नुकताच यादव आघाडीने आपल्याकडे खेचून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर युवक क्रांती आघाडीत देखील योग्य वेळी मातब्बर कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरू होतील, असे संकेत सूत्रांकडून दिले जात आहेत. सध्या नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी, कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला उपस्थिती, सार्वजनिक कार्यक्रमांना शक्ती प्रदर्शनाने उपस्थिती अशा विविध माध्यमातून दोन्ही आघाड्या जनसंपर्क व कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविण्यावर जाणीवपूर्वक जोर देत असल्याचे दिसत आहे.

नुकताच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या माध्यमातून पालिका निवडणूक लढविली जावी ,असा सूर कार्यकर्त्यांमधून जोर धरु लागला आहे. मात्र, २०११ मध्ये युवक क्रांतीने राष्ट्रवादीतून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविली होती. तर २०१६ मध्ये भाजपने कमळ व जनसुराज्याने नारळ चिन्हावर शहरात निवडणूक लढविली होती. त्यावेळी जनतेने त्यांना सपशेल नाकारुन स्थानिक आघाडीस विजयाचा कौल दिला होता. हा मागील राजकीय अनुभव लक्षात  घेता पक्षाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात हेही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.एकंदरीत , लोकसभा , विधानसभा निवडणुकीतील बदलती राजकीय समीकरणे आणि स्थानिक आघाड्यांचा प्रभाव आणि शहरातील प्रलंबित विकासकामे पाहता पेठवडगाव पालिकेची आगामी निवडणूक ही नेत्यांसाठी राजकीय प्रतिष्ठेची ठरणार आहे.त्यामुळेच या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर यादव, सालपे या पारंपरिक आघाड्यांसह नव्याने राजकीय आखाड्यात येवू पाहणाऱ्या नेतेमंडळींनी विविध माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली दिसल्याचे दिसत आहे.