‘नागरिक हो सजग व्हा’ या विषया व्याख्यान संपन्न
इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
“आज नागरिकांच्या समोर असलेले विविध प्रश्न आणि समस्या पाहताना असे लक्षात येते की सर्वसामान्य नागरिकांना सरकारी व निमसरकारी नियमांची माहिती नसते त्यामुळे या शासकीय व्यवस्थेकडून अन्याय आणि मनस्ताप सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणजे विविध प्रकारच्या शासकीय नियमांची माहिती नागरिकांनी करून घ्यायला हवी, त्याचबरोबर आपल्याला सेवा देणाऱ्या अशा प्रकारच्या संस्थांच्यावर लक्ष ठेवणारा दबाव गट आपण निर्माण करायला हवा” अशा आशयाचे प्रतिपादन ग्राहक हक्क आणि माहिती अधिकार मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी केले. येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी ‘नागरिक हो सजग व्हा’ या विषयावर ते बोलत होते.
“वीज मंडळ, महापालिका, बँका, विमा कंपन्या, टेलिफोन व मोबाईल, वाहतूक टोल याबाबतचे शासकीय नियम जाणून घेतले तर सर्वसामान्य ग्राहक आपले अधिकार मिळवू शकतात. त्याकरता माहिती अधिकार कायदा, ग्राहक संरक्षण कायदा, सेवा हमी कायदा यांची माहिती नागरिकांनी करून घ्यावी. कारण या शासकीय संस्थांच्याकडून चूक झाली तर ग्राहकांनाही भरपाई मिळण्याचे नियम आहेत. मात्र असे विविध नियम नागरिकांना शासकीय व्यवस्थेकडून माहिती करून दिले जात नाहीत, त्यामुळे अशी माहिती करून घेणे हे नागरिकांच्या सजगतेचे लक्षण आहे.” अशा आशयाची माहिती त्यांनी दिली.
या देशातील सर्वात मोठा झोल म्हणजे टोल व्यवस्था आहे या माध्यमातून होणारा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांच्याकडून २०१२ ते २०१९ या काळात जवळजवळ सव्वा लाख कोटी रुपयांची कर्जे राईटऑफ केलेली आहेत आणि त्यापोटी फक्त आठ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत ही एक प्रकारे सर्वसामान्य बॅंक ग्राहकांची फसवणूक आहे” अशी विविध प्रकारची माहिती त्यांनी यावेळी दिली.येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये सदरचे व्याख्यान पार पडले.
